मिलिंद अष्टीवकर,
रोहा-परीक्षा संपल्याने मुलांना सुटी लागली. निकालाचा दिवसही झाला. निकाल हाती पडताच ऐन उन्हाळ्यात काही दिवसांसाठी सुरू झालेल्या शाळांच्या पुढील हंगामाबरोबरच विद्यार्थी आणि पालकांची परवडही सुरू झाली. कडक उन्ह आणि वातावरणातील उष्म्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून तापमानवाढीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत पालकांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. विद्यार्थी आणि पालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन येथील एका शाळेने पुढील वर्षीपासून उन्हाळ्यातील ही काही दिवसांसाठीची शाळा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.परीक्षांचा हंगाम मार्चअखेर व एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात संपल्यानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये रममाण झालेल्या विद्यार्थी वर्गाला थोडी उसंत मिळाली होती. मात्र सुटीचा आठ पंधरा दिवसांचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर आणि वार्षिक निकाल लागला. त्यानंतर पुन्हा भर उन्हात शाळा सुरु झाल्या आहेत. सीबीएससी व काही स्टेट बोर्डाच्या शाळा उन्हाळ्यात दरवर्षी सुरू असतात. मात्र सध्या वाढणारे तापमान आणि उन्हाच्या झळांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही शाळांतील वर्गांमध्ये ४० ते ६५ विद्यार्थी पटसंख्या असली तरी एका वर्गात केवळ दोन पंखे असल्याने विद्यार्थ्यांना प्रतिकूल वातावरणात ज्ञानाचे धडे घ्यावे लागत आहेत. यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाविरुध्द नाराजी व्यक्त के ली आहे. निकाल लागल्यानंतर शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहतात. यंदा केवळ १० दिवसांसाठी जे.एम.राठी व ग्रिगोरीयन शाळा सुरू झाल्या आणि विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही परवड सुरू आहे. मुलांना गरमीच्या दिवसांतील या शाळेचा खूप त्रास होतो, उन्हाळ्यातील ही १० दिवसांसाठीची शाळा नसावी.- महेंद्र पाटील, पालक, रोहा