Suresh Dhas Latest News : पीक विमा योजनेवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सरकारला धारेवर धरले. "२०२०, २०२३ चा पीक विमा मिळालेला नाही. आणि राज्यात काय चाललंय? मी आमदारकीबरोबर ऊसतोड मजूरांचं काम करतो. सभागृहात बंजारा समाजाचा आमदार बसलेला असेल. माझ्या माहितीप्रमाणे बंजारा समाजात चार-पाचच आडनावं आहेत. रामापूर तांड्यावरून ४००० हेक्टरचा विमा भरला गेलाय. तांड्याचा एरिया ४००० हेक्टरचा असतो का? मला कुणीतरी सांगा. कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा", असे म्हणत आमदार सुरेश धस विधानसभेत कडाडले.
'पीक विम्याचा परळी पॅटर्न', असा उल्लेख करत सुरेश धस यांनी महायुतीच्या मागच्या सरकारमधील कृषिमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. "रामपूर तांड्यावरील ज्यांनी विमा भरलाय त्यांची नावं सांगतो. गुट्टे, कुट्टे, होळंबे, कराड, दहिफळे, जयस्वाल बंजारा समाजात जयस्वाल आडनाव कुठून आलं मला काही कळेना? गुट्टे कधी आलं? दहिफळे बंजारा कधी झाले? मला काही कळेना?", असा सवाल धस यांनी उपस्थित केला.
"आंधळे, मुंडे, लटपटे, चिखलबिडे, केंद्रे... ही आडनाव बंजारा समाजात कधी आले? बंजारा समाजात पाच आडनावंच आहेत. एका गावात चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय. २०२४ वर्षाचा. आमच्या तालुक्यातील लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कसे काय भरू शकतात? माझ नाव खामगाव चिखलीला आल्यावर कसं जमेल?", असे धस म्हणाले.
"परळीचा पॅटर्न लवकर लागू करावा म्हणून मोदी, शाहांना भेटणार"
"मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे की, पंतप्रधान पीक विमा योजनेत देशातील कोणत्याही सातबाऱ्यावर कोणीही नावे टाकू द्यायची. एकट्या सोनपेठ तालुक्यात १३ हजार १९० हेक्टरचा बोगस पीक विमा भरला गेला आहे. परळीचा हा नवीन पॅटर्न आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न. हा पॅटर्न सगळीकडे लागू करावा, अशी विनंती मी देशाच्या पंतप्रधानांकडे करणार आहे. लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित शाहांची आणि पंतप्रधानांची. हा जो परळीचा पॅटर्न आहे, तो सगळ्यात आधी गुजरातमध्ये लागू करावा आणि वाराणसीतही लागू करा अशी विनंती करणार", असे म्हणत सुरेश धस यांनी नामोल्लेख न करता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
"काय चाललंय? गरीब शेतकरी पैसा भरतोय. आम्हीच घोषणा केली की, १ रुपयात पीक विमा. वाजवा ढोल. घ्या ढोल. एक रुपयात विमा, परळी पॅटर्न. राज्याचे कृषिमंत्री कोण, मला त्यांचं नाव माहिती नाही. मी नाव घेणार नाही. २०२३-२४ चे कृषिमंत्री. २०२३ मध्ये थोडं साधलं. बीड जिल्ह्याचा आकडा सांगितला मी २०२३ चा, ७००० हेक्टरचा. धाराशिव जिल्ह्यात ३००० हेक्टरवर गुन्हे दाखल झाले आहेत", असे धस यांनी विधानसभेत सांगितले.
"आम्हाला पीओकेमध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा"
"हे काय चाललंय. धाराशिव जिल्ह्यात भरलेला ३००० हेक्टरचा विमा, सगळे शेतकरी परळी तालुक्यातील आहेत. माझ्या मतदारसंघात कासेवाडी आंबेवाडी गाव आहे. त्या गावाला महसूली दर्जाच नाही, तिथून ४००० हेक्टरचा विमा भरला गेलाय. आपल्या शेजारचे पॅटर्नवाले. परभणी जिल्ह्यातून ४० हजार हेक्टरचा बोगस विमा भरला गेला आहे. आता जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? आम्हाला पीओकेमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) नेऊन सोडायची तरी सोय करा", अशा शब्दात सुरेश धसांनी माजी कृषिमंत्र्यांवर घणाघात केला. सुरेश धस यांनी यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.