शरद पवारांनी निवृत्त व्हावं? अजितदादांच्या विधानावर उद्धव ठाकरेंनी परखड सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:04 AM2023-07-27T08:04:43+5:302023-07-27T08:05:30+5:30
केवळ अजित पवारच नाही तर ज्याला कोणाला त्याच्या स्वार्थासाठी जायचं असेल तर स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई – अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि समर्थक आमदारांनी पवारांच्या भूमिकेशी फारकत घेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्याच सभेत अजित पवारांनीशरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य केले. पवारांचे वय झाल्याने कुठेतरी थांबायला हवं असं म्हणत अजितदादांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितले. अजितदादांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना परखडपणे सुनावले.
संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी केलेले विधान हे अत्यंत वाईट आहे. कारण शेवटी ज्यांच्याकडून आपण सर्वकाही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्धार काढणे हे आपल्या संस्कृतीला शोभा देणारं नाही. नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान, आदर, सन्मान ठेवतो आणि तो ठेवलाच पाहिजे. वय झालं म्हणजे काय? मग आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? हे त्यांचे वक्तव्य मला आवडलं नाही. तुमचं पटत नसेल तर जाहीर सांगा की तुमचं पटत नाही. या वयातसुद्धा ज्यांनी तुम्हाला सगळं काही दिले त्यांना तुम्ही आता या पद्धतीने बोलणार हे मला पटलेले नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत केवळ अजित पवारच नाही तर ज्याला कोणाला त्याच्या स्वार्थासाठी जायचं असेल तर स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं. कदाचिक लोकं स्वीकारतील. पण चार-चार, पाच-पाच वेळा सगळं मिळाल्यानंतर सगळं जे चांगल्यात चांगले देता येणं शक्य होतं ते दिल्यानंतरसुद्धा अन्याय झाला हो, म्हणून टाहो फोडून जाणे हे बरोबर नाही. मग त्यात आमच्यातलेसुद्धा गद्दार असतील आणि सगळ्याच पक्षातले गद्दार असतील असा टोलाही पक्ष सोडून जाणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी लगावला.
अजित पवार-शरद पवार भेटीवर भाष्य
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांसह इतर मंत्र्यांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवर उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ज्याचा त्याचा मार्ग असतो. मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे आमने-सामने करणारा मी आहे. जशास तसं उत्तर देणारा मी आहे. ‘अरे’ला ‘का’रे करणारा आहे. त्यामुळे मी लढतोय. पवारसाहेबांची विचारधारा वेगळी असेल आणि त्याप्रमाणे ते जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.