मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपाने आधीच २० जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. राहिलेल्या २८ जागांमध्येही काही जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील महायुतीत सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. यातच आज राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेचा महायुतीमधील सहभाग जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जाते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ट्विट करत राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रेल्वे इंजिनाची दुटप्पी भूमिका अखेर स्पष्टच झाली आहे. याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की, ईडी चौकशांपासून वाचण्यासाठीची सावधगिरी..., असा टोलाही एनसीपी-एसपीने लगावला आहे.
दरम्यान, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत काय ठरले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. राज ठाकरे महाराष्ट्रात येऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेतात, महायुतीत जातात की मोदी सरकारविरोधात बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे,भाजपाने राज्यात आधीच २० जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. उर्वरित २८ जागांमध्येही काही जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी, शिवसेनेला मनसेसाठी एखादी जागा सोडावी लागू शकते, अशी शक्यता आहे. तसेच, राज ठाकरे महायुतीत सामील झाल्यास उद्धव ठाकरेंच्या गटासोबत लढत देणे भाजपाला सोपे जाऊ शकते.