मुंबई : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भापाठोपाठ मराठवाडाही स्वतंत्र करण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी सोमवारी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या अणेंची हकालपट्टी होईपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असे सांगत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सोमवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे श्रीहरी अणेंच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपस्थित केला. मुंडे म्हणाले की, हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला अणेंनी वेगळ््या विदर्भाची मागणी केली होती. आता तर विदर्भासोबत वेगळ््या मराठवाड्याची मागणी केली आहे. उद्या खान्देश, मुंबई वेगळी करण्याची मागणी करतील. त्यामुळे त्यांची महाधिवक्तापदावरून हकालपट्टी करावी. महाधिवक्त्याची मते व्यक्तिगत मानता येणार नाहीत. सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुंडे यांच्या स्थगन प्रस्तावाला काँग्रेस सदस्य संजय दत्त, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील, राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पाठिंबा देत, अणेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विरोधकांच्या घोषणाबाजीत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतरही विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली. आम्ही त्यांची सगळ््यांची भाषणे ऐकली. आता तुम्हीही ऐकायला हवे, असे बापट म्हणाले. घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज आधी दुपारी एक तर नंतर तालिका सभापती मुझफ्फर हुसैन यांनी दिवसभरासाठी तहकूब केले. (प्रतिनिधी)
अणेंच्या वक्तव्यावरून गदारोळ
By admin | Published: March 22, 2016 4:19 AM