मुंबई : शिवसेनेत बंड पुकारून सत्तांतर घडवणाऱ्या शिंदे गटाचे आमदार (Eknath Shinde) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) असलेले आमदार, या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी नोटिस बजावली आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचं उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता आणि त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या होत्या.
या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवालयाने आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या दोन्ही गटातील ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटीस बजावली आहे.
आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे गटातील ३९ आमदारांना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. आदित्य ठाकरे विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहाबाहेर होते. मात्र त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली नाही.
आदित्य ठाकरेंचे नाव आमदारांच्या यादीत का नाही? विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावानंतर, शिंदे गटाचे मुख्य व्हीप भरत गोगावले यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका केली, पक्षाच्या बाहेर मतदान केल्याबद्दल उद्धव गटाच्या १४ आमदारांवर निलंबनाची किंवा अपात्रतेची कारवाई करावी. मात्र त्या आमदारांच्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव नव्हते. यामागचे कारण स्पष्ट करताना भरत गोगावले म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांचे नाव दिलेले नाही. म्हणजेच शिंदे गटाने आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केलेली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवण्यात आली नाही.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीएकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. तसेच सुनील प्रभू यांची पक्षाचे मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती केली. यानंतर शिंदे सभापतींकडे गेले आणि त्यांची पुन्हा शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच भरत गोगावले यांची मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रतिस्पर्धी गटांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.