मुंबई : शिवसेना आणि शिवसैनिकांनी गेली पन्नास वर्षे अहोरात्र मुंबई सेवा करुनच मुंबई जिंकली आहे. तुमच्यासारख्या प्रचारसभा घेऊन जिंकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले आहेत. तरीही ते अजून थापाच मारत आहेत. आमची औकात काढली, कपडे उतरविण्याची भाषा केलीत, मुंबईकर जनता २३ तारखेला तुम्हाला औकात दाखवेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या प्रचारसभेत भाजपावर हल्लाबोल केला. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता असल्याने सर्वच पक्षांनी शनिवारी जाहीरसभा घेत आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिवसेनेची सभा झाली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा पारदर्शक होती. सभेला गर्दी झाली नाही म्हणून मुख्यमंत्रीही ‘पारदर्शक’ झाले, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंची देना बँक नाही तर लेना बँक आहे म्हटले होते. पण त्यांची ना लेना, ना देना बँक आहे, त्यांची केवळ नो अॅक्सिस बँक आहे. शिवसैनिकांची भरगच्चा बँक आमच्याकडे आहे तुमच्यासारखी रिकामी नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.मुंबई महापालिकेने केलेली कामे यांना दिसली नाही. मुंबई महापालिकेत आपली एकहाती सत्ता येणार आहे त्यानंतर आरोग्य कवच योजनेच्या शिबिरात सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार आहे, म्हणजे त्यांना पाटणा वगैरे दिसणार नाही. माझ्या सोन्यासारख्या मुंबईची तुलना पाटणाशी करून तिची अहवेलना करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निक्षून सांगितले.वीस वर्षे सोबत असताना आमचा भ्रष्टाचार दिसला नाही. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना भाजपाचे मंत्री भ्रष्टाचाराने किती बरबटलेले आहेत ते आधी सांगा. भ्रष्ट होतो तर मग युतीच्या चर्चेला आलातच कशाला, असा सवाल करतानाच तुम्हाला ११४ जागा सोडल्या असत्या तर मग आम्ही पारदर्शी ठरलो असतो का, असा सवाल उद्धव यांनी केला. त्यांच्या जाहिरातींप्रमाणेच भाजपाला आता ‘चल हट’ म्हणण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले. शिवसेना संपविण्याची भाषा केली गेली पण तुमच्या सात नव्हे सातशे पिढ्या खाली आल्या तरी शिवसैनिक हाती भगवा घेऊन तुमच्या छाताडावर नाचेल. शिवसेनेचा एक तरी नगरसेवक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडला असता, तर या भाजपाने थयथयाट केला असता. पारदर्शकतेत मुंबई अव्वल आहे. त्याचा अभिमान आहे. एकही रुपयाचे कर्ज डोक्यावर नसलेली मुंबई ही एकमेव पालिका आहे. हजारो कोटींच्या ठेवी बँकेत ठेवल्या. जनतेच्या या पैशावरच तुमचा डोळा आहे. आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही. (प्रतिनिधी)मोदींवर टीकामुंबईतील नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताय. पण हजारो कोटींचा पैसा खर्च करुनही गंगा नदीचे एक थेंब पाणी शुद्ध झाले नसल्याचा अहवाल खुद्द लवादाना दिला आहे. मग ‘नमामी गंगे’चा पैसा मोदींच्या खिशात गेला म्हणायचे का, असा सवाल उद्धव यांनी केला.
२३ तारखेला औकात दाखवू
By admin | Published: February 19, 2017 2:22 AM