ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - तातडीने औषधोपचार न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या एका रुग्ण आरोपीने सोमवारी रात्री रामदासपेठमधील खासगी इस्पितळात प्रचंड गोंधळ घातला. त्याच्या हातात पिस्तुल दिसल्यामुळे इस्पितळातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच सीताबर्डी पोलिसांनी धावपळ करून आरोपीला अटक केली.
अमित विक्रमादित्य तिवारी (वय ४२, दीक्षाभूमीजवळ, रा. बजाजनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो पेट्रोल पंपाचा संचालक असल्याचे सीताबर्डी पोलीस सांगतात. तिवारी रामदासपेठेतील त्या खासगी ईस्पितळात नेहमी औषधोपचाराला येतो. सोमवारी रात्री सातच्या सुमारास त्याला त्रास होऊ लागल्यामुळे तिवारी उपचारासाठी नेहमीप्रमाणे इस्पितळात पोहचला. यावेळी तेथे उपस्थित डॉक्टर आणि कर्मचा-याकडून त्याला लवकर प्रतिसाद मिळाला नाही. त्रास वाढल्यामुळे त्याने बरळणे सुरू केले. दारूच्या नशेत असल्याचा समज झाल्यामुळे तो बडबड करीत असावा, असा अंदाज काढून मेडिकल स्टोर्सजवळच्या एकाने त्याला गप्प बसण्याचा सल्ला दिला. त्यावरून त्याच्यासोबत तिवारीचा वाद झाला. यामुळे संतप्त झालेला तिवारी इस्पितळाच्या बाहेर गेला आणि त्याने त्याच्या कारमधून पिस्तूल सारखी दिसणारी लायटर गन काढली. ती हातात घेऊन तो इस्पितळात आला आणि वाद घालणा-या तरुणाला शोधू लागला. पिस्तुल हातात धरून आरोपी अश्लिल शिवीगाळ करतानाच आरडाओरड करीत असल्याचे पाहून इस्पितळातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. इस्पितळात एकच गोंधळ उडाला. एकाने सीताबर्डी ठाण्यात ही माहिती दिली. त्यावरून पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर तिवारीचा नाव, पत्ता मिळवून त्याच्या बजाजनगरातील घरी पोलीस पोहचले.पिस्तुल नव्हे लायटर !त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळची कथित पिस्तूल जप्त केली. विदेशी बनावटीच्या पिस्तुलासारखी दिसणारी ही पिस्तुल नव्हे तर सिगारेट पेटविण्यासाठी वापरले जाणारे लायटर असल्याचे स्पष्ट झाले. ते जप्त करून पोलिसांनी तिवारीला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र, तोपर्यंत पोलिसांचीही भंबेरी उडाली होती. इस्पितळात पिस्तुल हातात घेऊन एक आरोपी गोंधळ घालत असल्याच्या वृत्ताने वरिष्ठ अधिका-यांमध्येही खळबळ निर्माण झाली होती. काय नेमकी घटना झाली, आरोपी कोण आहे, यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी सीताबर्डी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सारखे फोन येत होते.