Supriya Sule On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केल्याचे वृत्त समोर आलं. त्यानंतर भाजप नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. भाजप नेत्यांनी टीका करताना सुप्रिया सुळे यांना जातीयवादी म्हटलं. या सगळ्या वादावर आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
"शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही..." असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी हे विधान केल्याचे म्हणत भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. लहानपणापासून शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, पवार हे जातीवादाचं विद्यापीठ आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं. आता सुप्रिया सुळेंनी या विधानावरुन स्पष्टीकरण दिलं.
"मी हे बोलल्याचा पुरावा काय आहे. मी हे सगळं कुठे बोलले याचा पुरावा द्या. महाराष्ट्रातील मायबाप जनतेला माझ्या बोलण्याची स्टाईल माहिती आहे. हे वक्तव्य मी करुठे केलं आहे ते सांगा आणि कुणीतरी व्हिडीओ दाखवा. मी विनम्रपणे भाजपला हात जोडून विनंती करते की मी जर हे बोलले असेल तर त्याचा व्हिडीओ दाखवावा," असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करतायेत - देवेंद्र फडणवीस
या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. "मी काही माध्यमात ही बातमी पाहिली. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांना हल्ला करा. ही आनंदाची गोष्ट आहे. यातून तुमचं राजकारणातील स्थान किती बळकट आहे याचा अंदाज येतो. सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर हल्ला करावा वाटतं. उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस तेच करते. हे माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करतायेत. तुम्ही चक्रव्यूह तयार करून मला अभिमन्यू करायचा प्रयत्न करत असला तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे त्यामुळे चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि त्यातून बाहेरही यायचं मला माहिती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी अभिमन्य होणार नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.