- संदीप प्रधान, मुंबईराज्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची आधार कार्ड तयार करून त्यांची ‘सरल’ या संगणकीय कार्यक्रमाद्वारे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यानंतर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सामाजिक संस्थांकरिता शाळाबाह्य मुलगा दाखवा आणि पाच हजार रुपये मिळवा, अशी योजना सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांनंतर ही योजना लागू केली जाईल, असे शिक्षण विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले.शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि सिस्टीमॅटिक अॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अॅचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट (सरल) संगणकीय प्रणालीबाबतचे आदेश जारी केले. ६ ते १८ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांना आधार कार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या महिनाभरात ती पूर्ण केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल अचूक माहिती संगणकीकृत करून त्याचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यामुळे बनावट विद्यार्थी नोंदवण्यास व त्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करून त्यांच्या वेतन व पेन्शनचा निधी लाटण्यावर निर्बंध येणार आहेत. परंतु त्याखेरीज विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे गुण नोंदवले जाणार असल्याने कुठला मुलगा-मुलगी शाळेत जातात व त्यांची शैक्षणिक प्रगती काय ते क्षणार्धात समजू शकेल. पुढील तीन महिन्यांत विद्यार्थ्यांच्या संगणकीय नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर शाळाबाह्य मुले दाखवा आणि पाच हजार रुपये मिळवा, ही योजना लागू केली जाणार आहे.त्याचबरोबर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेची अंमलबजावणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषा व गणित विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून घेण्यात येणार आहेत. गेल्या पाच वर्षांत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत ९४ टक्क्यांवरून ७४ टक्के घट झाली आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सर्वेक्षणात भाषा विषयात सरासरी संपादणूक 53%तर गणित विषयात सरासरी संपादणूक ५१ टक्के आहे.भाषा विषयात सर्वोकृष्ट संपादणूक 67%सिंधुदुर्ग जिल्हा, तर सर्वात कमी संपादणूक ३४% सोलापूर जिल्हा गणित विषयात सर्वोकृष्ट संपादणूक 61%भंडारा, तर सर्वात कमी संपादणूक ३४ टक्के औरंगाबाद जिल्हा आहे.
शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा, पाच हजार मिळवा
By admin | Published: July 28, 2015 2:35 AM