मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बिनबुडाचे आरोप करून देशभर अराजकता माजवण्याचे षड्यंत्र काँग्रेसने रचले आहे, असा आरोप स्वातंत्र्यवीरांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केला. मध्य प्रदेशमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी ‘सावरकर कितने वीर’ ही पुस्तिका सेवा दलाच्या सदस्यांना वाटून काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला आहे. याची दाखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत कठोर पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. या पुस्तिकेवर बंदी घातली गेली नाही, तर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.भाजप कार्यकर्ते मैदानातदरम्यान, काँग्रेसने या प्रकरणात देशाची आणि सावरकरांची बिनशर्त माफी मागावी, लिखाण मागे घ्यावे यासाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी बोरीवलीत सावरकरांच्या सन्मानार्थ भाजप कार्यकर्ते मैदानात उतरले. भाजप आमदार सुनील राणे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि बोरीवलीकरांनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासमोरच सकाळी १० ते २ या वेळेत आंदोलन केले.‘सावरकर कितने वीर’ या पुस्तिकेवर सरकारने बंदी घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात माजी आमदार हेमेंद्र मेहता, नगरसेवक गणेश खणकर, उत्तर मुंबई भाजप उपाध्यक्ष श्रीकांत पांडे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
'सावरकरांच्या बदनामीचे षड्यंत्र रचणाऱ्यांना जागा दाखवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:48 AM