काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका घोटाळ्याप्रकरणी सभागृहात पेन ड्राईव्ह सादर केला होता. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. "देवेंद्र फडणवीस शूर आहेत, लढाऊ आहेत असं वाटत होतं. त्यांनी जे काही पेन ड्राईव्ह सभागृहात दिली, त्यावरून मला तो काही शूरपणा वाटला नाही. तिकडे देऊन काही होणार नाही. जास्तीतजास्त अध्यक्ष हे ते बनावट असल्याचं सांगतील. नंतर फडणवीस काय करतील?," असा सवाल आंबेडकर म्हणाले.
शूरपणाचं राजकारण असतं तर फडणवीस यांनी हा पेन ड्राईव्ह लोकांसमोर आणला असता. जे काही बोलावं ते उघडपणे बोलावं, असंही आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "तुम्ही विरोधीपक्षाचे नेते आहात. त्यामुळे सर्व जनतेसमोर उघड करणंही आवश्यक आहे. त्यात काय आहे हे सांगा. त्या गुलकंदाचा गोडावाही फडणवीसांनी सांगावा," अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
"... ते जनताच ठरवेल"नारायण राणेंनी मध्यंतरी दिशा सालियन संदर्भात वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांनी तथ्य दिलं नाही. यानंतर शिवसेनेनं राणेंवरही आरोप केले, त्यावेळी त्यांनीही तथ्य दिली नाहीत. सामान्य माणूस हे फक्त टीव्हीवर ऐकतो. पण तथ्य नसल्यानं स्वत:चं मत निर्माण करता येत नाही. लोकांना जर असं वाटलं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, तर लोकं स्वत: सांगतील, असंही ते म्हणाले.
"काँग्रेसनं मला पाडण्याचं राजकारण केलं"काँग्रेसनं मला पाडण्याचं राजकारण केलं. हे सर्व आंबेडकरी समूहाला हे कळून चुकलंय की त्यांनी चळवळ संपवण्याचं पायंडा पाडलाय. त्यामुळेच लोकांनी पाठ फिरवली. मुस्लीम समाजानाही पाठ फिरवली. आता काँग्रेसनं स्वत:चं पाहावं. अशा परिस्थित जर ते समझौता करण्याचं राजकारण केलं नाही, तर जे व्हायचं ते होईल. राजकारणात कधीही शत्रूत्व नसतं, ते मतभेद असतात. आम्ही भाजप, रा.स्व.संघासोबत कधीही जाणार नाही असं म्हणतो कारण आम्ही दोघंही वेगवेगळ्या टोकाला आहोत. तसं काँग्रेससोबत नाही, इतर पक्षांशी नाही. आम्ही जुळवून घेण्याचा मार्ग उघडा ठेवला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.