वाराणशी : निवडणूक आयोगाशी थेट संघर्ष करताना भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आदेश झुगारून काढलेला रोड शो आणि बेनियाबाग येथील मोदींच्या प्रचारसभेला परवानगी न दिल्याबद्दल अरुण जेटलींसह भाजपा नेत्यांनी लंका क्षेत्रात सकाळी धरलेले धरणे अशा शक्तिप्रदर्शनामुळे वाराणशीची ‘लंका’ गुरुवारी राजकीयदृष्ट्या कमालीची तापली होती. ‘दबावाखाली’ काम करणारा निवडणूक आयोग आपल्याविरुद्ध पक्षपात करीत असल्याचा आरोप करणार्या मोदींनी सभा घेण्याची परवानगी नाकारल्याच्या निषेध म्हणून प्रतिबंधात्मक आदेश झुगारून बनारस हिंदू विद्यापीठापासून काढलेला तब्बल सात किमीचा हा रोड शो म्हणजे शक्तिप्रदर्शनच होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोफा पश्चिम बंगालमध्ये धडाडत असतानाही गुरुवारच्या दिवशी आदेश झुगारून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणारे मोदी आणि वाराणशीतील नाट्य केंद्रस्थानी राहिले. जिल्हा प्रशासनाने मोदी यांच्या वाराणशी येथील प्रचारसभेला परवानगी नाकारल्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर येथून १२ किमी अंतरावर असलेल्या रोहनिया येथे मोदींची जाहीर सभा झाली. संपूर्ण शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असताना सायंकाळी ४.३० वाजता मोदी रोहनिया येथे पोहोचले. वाराणशीमधून निवडणूक लढत असलेले मोदी तसेच भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक आयोग विरुद्ध भाजपा असा सामना रंगत असतानाच मोदी यांच्या रोड शोमुळे वाराणशीत कमालीचा तणाव होता. मोदी बनारस हिंदू विद्यापीठाच्या परिसरातील ‘हेलिपॅड’वर उतरले. तेव्हा जवळच पक्षाची निदर्शने सुरू होती. त्यानंतर, मोदींनी कुठल्याही प्रकारच्या पूर्वपरवानगीशिवाय सुरु केलेला ‘रोड शो’ सिंग्रा येथील भाजपाच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयापुढे संपला. शहरात जमावबंदीचे कलम १४४ लागू असतानाही रोड शोदरम्यान भगवी टोपी घातलेले पक्षाचे कार्यकर्ते जागोजागी त्यांचे स्वागत करीत होते. रस्त्याच्या दुतर्फा उसळलेल्या गर्दीमुळे मोदींचा ताफा संथगतीने पुढे सरकत होता. (विशेष प्रतिनिधी)
प्रांजल यादव यांना हटवा
जिल्हा प्रशासनाने वारंवार संभ्रम निर्माण करण्याचा तसेच पक्षाच्या प्रचाराची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांच्या वागणुकीतून पक्षपातीपणा दिसून आला. त्यांना तत्काळ तेथून हटवले पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.
माझा गेल्या १४ वर्षांपासून छळ सुरू आहे...
काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे निवडणूक आयोगाशी ‘फिक्सिंग’ असल्यामुळेच वाराणशीतील माझ्या सभेला परवानगी नाकारण्यात आली. माझ्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगून मला वाराणशीत येण्यास काँग्रेस व समाजवादी पक्ष प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु, माझ्यासारख्या सामान्य माणसाचे ते जर संरक्षण करू शकत नसतील तर केंद्रातील आणि राज्यातील हे सरकार कोणत्या कामाचे ? माझा गेल्या १४ वर्षांपासून छळ सुरू आहे, पण मी शांत आहे. माझ्या वाणीपेक्षा माझ्या मौनात जास्त ताकद आहे, असे मोदी यांनी वाराणशीत सांगितले.