नालासोपारा : वसईतील श्रद्धा वालकर हिच्या हत्या प्रकरणाने मुंबईसह दिल्लीतही खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक वसई दाखल झाले आहे. शुक्रवारपासून दिल्ली पोलिसांनी सहा जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. शनिवारी नव्याने श्रद्धाचा मित्र गॉडविन राॅड्रीग्ज, राहुल राय, मालाड येथील कॉल सेंटरचा मॅनेजर करण बहरी आणि श्रद्धाची मैत्रीण शिवानी म्हात्रे या चौघांचे जबाब नोंदवले आहेत. शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी डॉक्टर शिंदे आणि श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर या दोघांचे जबाब नोंदवले. मात्र शनिवारी जबाबदातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धा आणि आफताब या दोघांनादेखील ड्रग्सचे व्यसन होते, अशी माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.आफताफने गांजाचे सेवन करून श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर दहा तास तिचे ३५ तुकडे केले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना त्याने दिली आहे. तसेच शनिवारी गॉडविनने दिलेल्या जबाबातदेखील श्रद्धा ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे. या तपासाचा महत्त्वाचा भाग असलेले आफताबचे आई-वडील अद्याप कुठे आहेत याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नसून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
आफताबच्या आई-वडिलांना कृत्याची माहिती? -आफताफचे आई-वडील गेली अठरा वर्ष वसईत राहत होते. मात्र अचानक दिवाळीच्या आधी त्यांनी घर खाली केले. त्यामुळे आफताबच्या आई-वडिलांना आफताबने केलेल्या क्रूर कृत्याची माहिती असावी, असा संशय पोलिस वर्तवत आहेत. आता पोलिस श्रद्धा ड्रग्स कोणाला विकत होती आणि कोणाकडून खरेदी करत होती याचा देखील तपास होण्याची शक्यता आहे. तसेच श्रद्धा आणि आफताबचे मित्र-मैत्रिणींची दिल्ली पोलीस अधिकाधिक तपास करून माहिती जाणून घेत आहेत.