वसई : श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिने लग्नास होकार दिला होता. मात्र, दुःखात असल्याने वडिलांनी काही काळ थांबण्यास सांगितले होते. कदाचित याचा तिला राग आला असावा, त्यामुळे तिने घरचा पत्ताही कुटुंबीयांना सांगितला नव्हता, असे आता उघड झाले आहे. काबाडकष्ट करून लहानाचे मोठे केलेल्या आपल्या मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध वागणे श्रद्धाच्या आई- वडिलांना आवडले नव्हते. मात्र, आपण आता २५ वर्षांची झाल्यामुळे मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे सांगत तिने घर सोडले होते. दरम्यान, आफताबच्या प्रेमात वेडी होऊन घर सोडलेल्या श्रद्धाला आफताब मारहाण करीत असे, हे श्रद्धाने कधीच सांगितले नसल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. मात्र, ती आफताबच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती आणि आफताब तिला मारहाण करायचा असे तिच्या मित्रांकडून त्यांना समजले होते. मात्र, तिने ही बाब कुटुंबीयांना कळवली नाही तसेच परत येण्याबाबत निर्णयही घेऊ शकली नाही, असे ते म्हणाले.
शेजारचे अनभिज्ञआफताबच्या कुटुंबीयांनी वसईतील घर सोडून ते अन्यत्र राहायला गेले आहेत. ते नेमके कुठे गेले आहेत, याची माहिती तेथील रहिवाशांना नाही. त्यांचा लहान मुलगा असद याला मुंबईला नोकरी लागल्याने ते मुंबईला गेले आहेत. रेल्वेने गर्दीतून ये- जा करताना त्रास होत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.