नालासोपारा : वसईच्या श्रद्धा वालकर (२७) हिची तिचा प्रियकर आफताब याने दिल्लीमध्ये निर्घृणपणे हत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरला उघड झाली होती. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर डिसेंबर २०२० पासून श्रद्धाला आफताब मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, असा दावा तिच्या मित्र-मैत्रिणींनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून श्रद्धाला आफताब मारहाण करत होता, तर ती त्याच्यासोबत का राहत होती, हा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्याची मारझोड तसेच होणारा त्रास, छळ ती का व कोणत्या कारणाने सहन करत होती, असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
तिच्या मित्र-मैत्रिणींनी श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर अनेक दावे केले आहेत. त्यापैकी डिसेंबर २०२० मध्ये आफताबने एव्हरशाईन येथे राहत असताना तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिला तुळींज पोलिस ठाण्यात मित्र घेऊन गेला होता. तुळींज पोलिसांनी लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण तिने याकडे कानाडोळा केला व मेडिकल करण्यासाठी ती गेलीच नाही. तेव्हा ती मेडिकल करण्यासाठी का गेली नाही? कोणत्या कारणामुळे तिने माघार घेतली?, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
...तर श्रद्धा जिवंत असती- श्रद्धाने मेडिकल व गुन्हा दाखल केला असता तर आज कदाचित श्रद्धा जिवंत असती, असे तिचा मित्र राहुल राय याने सांगितले.- आफताबने श्रद्धाला अनेक वेळा मारहाण केली होती, असे तिच्या मित्र-मैत्रिणींकडून आता सांगितले जात आहे. पोलिसही श्रद्धा आणि आफताब या दोघांच्याही मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबीयांचे जबाब नोंदवत आहेत.