नागपूर: महाराष्ट्रातील तरुणी श्रद्धा वालकर हिची दिल्लीत आफताब पुनावाला नावाच्या तरुणाने निर्घृण हत्या केली. त्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी (Shraddha Walkar) विशेष पथक नेमून चौकशी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली. तसेच, आरोपी आफताबला फाशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार(Ajit Pawar) यांनी केली.
श्रद्धा वालकर प्रकरणाचा सामाजिक परिणाम लक्षात घेऊन, अशा घटना पुन्हा घडू नये याबाबत कायदा करणार का? अशी विचारणा करत आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती. यावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणात काही गंभीर विसंगती असल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणले. तसेच, विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन या प्रकरणी चौकशी करा, अशी आग्रही मागणी भाजपा शेलार यांनी केली आणि ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.
70 तुकडे केले तर समाधान वाटेल-अजित पवार श्रद्धा वालकर प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आपल्याकडे असा काही कायदा असता की, त्या आफताबने श्रद्धाचे जसे 35 तुकडे केले, तसे त्याचे 70 तुकडे केले, तर सगळ्यांना समाधान वाटेल. श्रद्धा प्रकरण दिल्ली पोलिसांकडे आहे आणि दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलून या प्रकरणाचा कसा लवकरात लवकर निकाल लावावा. त्या आरोपीला कडक शासन होईल याबाबत आपण कार्यवाही करणार का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण नेणार- देवेंद्र फडणवीसयावर बोलातना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण नेणार आहे. या प्रकरणी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्यात येईल. श्रद्धाने आफताबची तक्रार केली होती मात्र परत का घेतली, याची चौकशीही होईल. यासोबतच तिने तक्रार करण्यात आणि ती परत घेण्यात एका महिन्याचा कालावधी गेला. या एका महिन्यात पोलिसांनी काय कारवाई केली? या सर्वांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली. आपली मुलगी होती म्हणून गृहमंत्र्यांना विनंती करू लवकरात लवकर फाशी व्हावी, असेही फडणवीस म्हणाले.