नागपूर : श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६०० ऐवजी वाढीव हजार रुपये अनुदान करण्याबाबतचा निर्णय शासन लवकरच करणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य बच्चू कडू, आशिष देशमुख, अनिल बोंडे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राजकुमार बडोले यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत अनुदान वाढविण्यासंदर्भात अनेक संघटनांनी मागणी केली होती. त्यामुळे ६०० रुपयाऐवजी हजार रुपये मानधन देण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. यावर बच्चू कडू यांनी किती दिवसात निर्णय घेतला जाईल, याचा स्पष्ट खुलासा करण्याची मागणी केली. यावर लवकरात लवकर निर्णय गेऊन असे बडोले यांनी सांगितले. दरम्यान मंत्री महोदयांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विधानसभा सदस्य बच्चू कडू यांनी निषेध व्यक्त करीत सभात्याग केला. (प्रतिनिधी)
‘श्रावणबाळ व संजय गांधी निराधार’ वाढीव अनुदानाचा निर्णय लवकरच
By admin | Published: December 12, 2015 12:20 AM