49 वर्षांपासून परंपरा; 700 वारकर्यांचा सहभाग
फहीम देशमुख
शेगाव, दि. ११ - गण गणात बोते... जय हरी विठ्ठल... व गजानन नामाचा जयघोष करीत शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सकाळी 7 वा. विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पालखीचे हे 49 वे वर्ष असून 700 वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो दिंड्या विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. या पालख्यांमध्ये विदर्भातून सर्वात मोठी पालखी श्री संत गजानन महाराज संस्थानची असल्याचे नावलौकिक आहे. आज सकाळी 6 वाजेपासून मंदीरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती. भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्थ शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.आर.सी.डांगरा, कार्यकारी विश्वस्थ निळकंठदादा पाटील, किशोर टांक, नारायणराव पाटील, त्रिकाळ सर, अशोक देशमुख, शरद शिंदे, राजेंद्र शेगोकार, गोविंद कलोरे, पंकज शितुत आदींची यावेळी उपस्थिती होती. पालखीसोबत 700 वारकर्यांसह 2 रूग्णवाहीका, पाण्याचे टँकर, 2 ट्रक, पावसाळी साहित्य आदीही रवाना करण्यात आले.
पालखी सर्वप्रथम प्रकट स्थळावर पोहचल्यानंतर तेथे पुजा अर्चना करण्यात आली. यानंतर नागझरी रोडवरील युवराज देशमुख यांच्या मळ्यात चहापाण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ‘श्रीं’ची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पालखी नागझरी मार्गे जाणार असून आजचा मुक्काम पारस येथे राहणार आहे त्यानंतर निमकर्दा, गायगाव, भौरद मार्गे 13 जून रोजी पालखी अकोला शहरात दाखल होणार आहे. अकोला येथे पालखीचे 2 दिवस मुक्काम असून तेथून पुढे वाडेगांव मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे. 13 जूलै रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार असून तेथे पालखीचा 8 दिवस मुक्काम राहणार आहे. त्यानंतर 19 जूलै रोजी पालखी शेगांवकडे पंढरपूरवरून मार्गस्थ होणार आहे. तर शेगांव शहरात पालखीचे पुनरागमन 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.