- अनिल गवई
खामगाव, दि. २ : शुभ कार्यात, कोणत्याही देवी-देवतांच्या पूजेत श्रीफळ म्हणजेच नारळाला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीफळाशिवाय पूजा आणि कलश स्थापना होवूच शकत नाही, अथवा दुस-या कुणाला या फळाचे स्थान घेता नाही. असे बहुमोल असलेल्या ‘श्रीफळा’ला अखेर नमावे लागले आहे.
देवी-देवतांची पूजा, गृहप्रवेश, मंगल प्रसंग आदीमध्ये कलश स्थापन करण्याची परंपरा भारतात आहे. कलश स्थापनेसह, सत्कार प्रसंगातही श्रीफळाचीच भेट दिली जाते. श्रीफळाच्या म्हणजेच नारळाच्या झाडाला ‘भूतलावरील कल्पवृक्ष’ असेही संबोधतात. पुराण, वेद, उपनिषदांमध्येही श्रीफळाचे महत्व सांगितले गेले आहे. मानाचे स्थान असलेल्या श्रीफळाला अखेर नमती घ्यावी लागली आहे. त्याचे कारणही तसेच असून, गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत श्रीफळाच्या किंमतीत निम्याने घट झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांच्या सुरूवातीलाच श्रीफळाचे भाव घसरल्याने किरकोळ विक्रेतेही हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ठोक बाजारात श्रीफळाचे दर १५००-१७०० रुपयापर्यंत तर जून-जुलै महिन्यात १२००-१४०० आणि जुलै अखेरीस ७३०-७५० रुपयांना श्रीफळाचे एक पोते मिळत आहे. त्यामुळे साहजिकच किरकोळ बाजारातही श्रीफळाचे दर पडले आहेत.
श्रीफळाचे किरकोळ बाजारातील दर
महिनाभाव
मार्च, एप्रिल, मे२०
जून-जुलै१८-१५
जुलै अखेर, आॅगस्ट१०
सणासुदीच्या दिवसाच्या सुरूवातीलाच नारळाचे दर पडले आहेत. त्यामुळे अत्यल्प दरात म्हणजे केवळ १० रुपयाला नारळ विकावे लागत आहे.
-सरस्वतीताई भारसाकळे,
किरकोळ नारळ विक्रेता, खामगाव.