नागपूर, दि. 17 - ‘अच्छे दिन’ आणायला पैसे लागतात. पण, महाराष्ट्र सरकार भिकारचोट आहे. अशा सरकारपासून स्वतंत्र विदर्भाची अपेक्षा कशी करता येईल, असे तोंडसुख घेत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी फडणवीस सरकारवर रविवारी नागपुरात टीकास्त्र सोडले.
विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १ मेपासून सुरू केलेल्या रक्ताक्षरी कार्यक्रमाचा समारोप संविधान चौक येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अॅड. अणे म्हणाले, राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ६० टक्के पैसा स्वत:चे नोकरशाह व कर्ज फेडण्यासाठी जातो. उरलेले ४० टक्के जीएसटीमुळे केंद्राने नेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आता केंद्राकडे भीक मागावी लागतेय. हीच अवस्था इतरही राज्याची असल्याने राज्याचे पैसे संपलेल्या नितीश कुमारसारखा माणूस मोदींना जाऊन मिळतो.
विदर्भाच्या मागणीला रक्ताने सह्या करून पाठिंंबा देण्यासाठी ही मोहीम राबविली होती. यामध्ये विदर्भातून १० हजार लोकांनी रक्ताने सही करून पाठिंंबा देत असल्याचे सोपविले आहे. हे सर्व पत्र पंतप्रधान मोदींना सोपविणार आहोत, असे ते म्हणाले.
नागपूरमध्ये मेट्रो आली, सुपर हायवे केला आणि बुलेट ट्रेन चालविली म्हणजे विदर्भाचे ‘अच्छे दिन’ आले असे मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाच्या लोकांना वाटते. मात्र शेतक-यांची परिस्थिती या सरकारला बदलता येत नाही. कोणत्याही युद्धात किंवा दहशतवादी हल्ल्यात माणसे मारली गेली नाही एवढ्या विदर्भातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकारला त्याचे काही वाटत नाही. आत्महत्यांचा आकडा ३० हजारावरून ६० हजारावर गेला तरी चालेल मात्र बुलेट ट्रेन धावली पाहिजे, असे या सरकारला वाटते. उसाला हमीभाव मिळाला, मात्र विदर्भाच्या कापूस, तूर, सोयाबीन व भाताला हमीभाव मिळत नाही. तो ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही व भाव ठरविणाºया केंद्रातील प्रतिनिधींना येथील शेतकºयांचा हिशेब माहीत नाही. त्यामुळे हे सरकार आपली परिस्थिती बदलेल ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे, असे अॅड. अणे म्हणाले.
काँग्रेस आणि आता भाजपा या दोन्ही पक्षांनी विदर्भाचा राजकारणापुरता वापर केला आहे व मतापुरती आपली किंमत लावली आहे. मात्र आता मतांतर करून या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. सध्याच्या काळात देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोनच नेते चालवितात. त्यामुळे येथील फडणवीस, गडकरी किंवा मोहन भागवत यांना दाद मागून उपयोग नाही. केंद्रातील या दोनच नेत्यांना या समस्या कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे दिल्लीला जाऊन तख्त हलवावेच लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
- केंद्र सरकार उन्मत्त हत्तीसारखे
अॅड. श्रीहरी अणे यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. सध्या देशात कायद्याबाहेरच्या अनेक गोष्टी घडत आहेत. राज्याचा अॅडव्होकेट जनरल म्हणून गोहत्या प्रतिबंधक कायद्यासाठी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत राज्याची बाजू मांडली. परंतु याचा अर्थ गाईसाठी रस्त्यावर मुस्लीमांना मारा किंवा वैधरीत्या मांस विकणा-यांना विनाकारण ठोकून काढा, असा होत नाही. मात्र आज हे सर्व राजरोसपणे देशात सुरू आहे. तुम्ही व्यक्त केलेले मत जर सरकारच्या समर्थनार्थ नसेल तर हत्या करण्यापासून सोशल मीडियावर हेटाळणी करून तुमची विल्हेवाट लावली जाते. चिंताजनक म्हणजे सरकार या गोष्टींना नियंत्रणात न आणता पाठीशी घालत आहे. त्यांना या परिस्थितीशी काही देणेघेणे नाही. हे सरकार उन्मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे वागत आहे. मात्र जनतेला या सर्व गोष्टी कळायला लागल्या आहेत. परिवर्तन होत असून हळूहळू सर्वांना हे समजेल व या सरकारला घरी जावे लागेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.