ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुलांप्रमाणे मुलींनी दुचाकी चालवणे ही बाब आता सामान्य झाली असून, त्यात काही नावीन्य उरलेले नाही. शहरातल्या रस्त्यांवर अनेक मुली स्कूटी चालवत असल्याचे चित्र सर्रास दिसते. मुलींच्या दुचाकी चालवण्यात झालेला बदल म्हणजे मुलींनाही आता मुलांसारखी वा-याच्या वेगाशी स्पर्धा करत वेगाने बाईक चालवण्याचा मोह होऊ लागला आहे आणि महत्वाचं म्हणजे मुलीही यशस्वीपणे वेगाने बाईक चालवू लागल्या आहेत.
याचे ताजे उदहारण म्हणजे श्रेया अय्यर. २४ वर्षाच्या श्रेयाला नुकतेच इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपसाठी टीव्हीएसने करारबद्ध केले. इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशीपसाठी करारबद्ध झालेली श्रेया देशातील पहिली महिला बाईक रायडर आहे. मूळची बंगळुरुच्या असणा-या श्रेयाने मोटर बाईक स्पोटर्समध्ये करीयर करण्यासाठी आपली कॉर्पोरेटमधली नोकरी सोडली.
श्रेया भावनिकदृष्टया बाईकशी जोडलेली असून, बाईक तिचे पहिले प्रेम आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून श्रेया बाईक चालवत आहे. श्रेयाकडे घाट, डोंगर माथ्यावरुन बाईक चालवण्याचा चांगला अनुभव आहे. बाईक रेसिंगकडे फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेला खेळ म्हणून पाहिले जाते. पण श्रेयाने हा समज चुकीचा ठरवला आहे.