ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सरकारमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात भव्य स्मारक उभं राहत असल्याचं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितलं आहे. काँग्रेसच्या काळातल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे तीनदा बैठका केल्या. मात्र तरीही स्मारकाला तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी परवानगी दिली नव्हती.
सीआरझेडच्या नियमात परवानगी देता येत नाही. त्यामुळे आम्ही सीआरझेडच्या नोटिफिकेशनमध्ये दुरुस्ती केली. आणि दुरुस्ती केल्यानंतर पहिली नोटिफिकेशन निघालं आहे. शेवटच्या नोटिफिकेशमुळेच समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. नेव्ही, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरिटाइम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस आयुक्त, सीआरझेड, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, महापालिका आयुक्त, बेस्ट महासंचालक, एव्हीएशन ऑथोरिटी ऑफ इंडियाची परवानगी घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. हा राजकारणाच्या पलिकडचा विषय असल्याचंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं आहे.