मुंबई : गणेशोत्सव मंडळांवर उच्च न्यायालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे मंडळांच्या उत्साहावर आधीच विरजण पडलेले असताना, आता कुणाच्या नवसाला सरकार पावणार यावरून शिवसेना-भाजपा या दोन्ही सत्ताधारी पक्षांत चढाओढ सुरू झाल्याने मंडळांची पुरती दमछाक होत आहे. उच्च न्यायालयाने रस्त्यांवर मंडप घालण्यास बंदी केली असून, ध्वनिप्रदूषण न करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. या आदेशांमुळे बृहन्मुंबई व ठाणे या महानगरांसह राज्यातील इतर शहरांमधील गणेशोत्सव मंडळांसमोर उत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेने या आदेशांबाबत आक्रमक पवित्रा घेत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका घेतली. तर भाजपाने जनाधिकार समितीची बैठक घेऊन सुनील राणे व अमित साटम यांना न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला होता. त्यांचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. विनापरवाना बांधलेले मंडप काढण्याचे आदेश सरकारने महापालिकांना दिले आहेत. या प्रकरणी सरकार आपली बाजू गुरुवारी न्यायालयात मांडणार आहे.-----------------उत्सवावरील विघ्न दूर होईल...गणेशोत्सव व नवरात्रोत्सव यावर गंडांतर आले आहे. त्यामुळे उत्सव साजरा करायचा किंवा कसे, याबाबत मंडळांमध्ये संभ्रम आहे. चर्चा काय झाली ते सांगण्याची ही वेळ नाही. उत्सव साजरा व्हावा याकरिता कायद्यात दुरुस्ती करणार किंवा कसे, हे सांगता येणार नाही. परंतु उत्सवावरील विघ्न दूर होईल, अशी आशा आहे.-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख-------------------मंडळांसाठी हे बंधनकारकच! अन्यथा कारवाई!!मंडप किंवा कोणतेही अन्य बांधकाम यांना परवानगी देताना, परवानगीचा तपशील संबंधित मंडपाच्या दर्शनीभागावर ठळकपणे लावावा. आवश्यक मंजुरी न घेता सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेले तात्पुरते बुथ/मंडप वा अन्य बांधकाम उत्सवापूर्वी, धार्मिक कार्यक्रमांपूर्वी काढून टाकण्यात यावे.मंडप किंवा कोणतेही अन्य बांधकामास परवानगी देताना नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर विपरित परिणाम होणार नाहीयाची दक्षता घ्यावी. उत्सव, कार्यक्रमांपूर्वी किमान ७ दिवसांपूर्वी दर्शनीभागावर लावण्यात येणारा परवानगीचा तपशील तपासणे. परवानगीचा तपशील नसल्यास मंडप काढून टाकण्याबाबत कार्यवाही करणे.पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंमलबजावणी-दरम्यान बाधा आल्यास संबंधित पोलीस स्टेशनकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविणे.-------------------उद्धव ठाकरे हे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार, हे माहीत असल्यानेच शेलार यांनी मंगळवारी रात्री ‘वर्षा’ गाठून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. ------------------------गणेशोत्सवासाठी आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. तर चर्चेचा तपशील कशाला द्यायला हवा, असे उद्धव यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
श्रेयाचा ‘श्रीगणेशा’!
By admin | Published: July 09, 2015 2:58 AM