शेगाव : संत नगरीची वैभवशाली ओळख केवळ देशालाच नव्हे तर जगाला करून देणारे व्यक्तिमत्त्व, अध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ, ‘श्रीं’च्या विचारांना अनुसरून माणुसकी धर्म निभावण्यासाठी आयुष्य वेचणारे श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी. बुधवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेगावनगरीसह संपूर्ण विदर्भावर तसेच श्री भक्तांवर शाेककळा पसरली आहे.
गत तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्यूअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली हाेती. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर घरीच वरिष्ठ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले. त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे शहरातील डाॅक्टरांसह बुलडाण्यातील डाँक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊसाहेबांमागे दोन मुले, तीन मुली, पत्नी तसेच नातवंडे, असा आप्त परिवार आहे.
त्यांच्या निधनाने श्री भक्तांवर दु:खाचा डाेंगर काेसळला असून, त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी माेठी गर्दी केली. राजकारण, समाजकारणातील मान्यवर तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी भेट देऊन शाेकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शेगावमधील अनेक व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून भाऊंच्या निधनाबद्दल दुखवटा पाळला.