मुंबई – मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली. सासरवाडीच्या लोकांवर ईडी कारवाई झाल्याने मुख्यमंत्री ठाकरेंसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री पदावर एखादी व्यक्ती बसली की साहजिकच तिच्या नातेवाईकांच्या अपेक्षा वाढतात. सत्तेचा लाभ आपल्यालाही मिळवता येईल का असा विचार केला जातो, मग प्रशासनात हस्तक्षेप होतो आणि तिथेच चूक होते.
रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या(Shridhar Patankar) मालमत्तांवर ईडीने टाच आणली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गोत्यात सापडले. पण नातेवाईकांमुळे आणि विशेषत: सासरवाडीमुळे अडचणीत आलेले उद्धव ठाकरे हे काही पहिले मुख्यमंत्री नाहीत. याआधी महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांना आपल्या सासरवाडीच्या माणसांमुळेच खुर्ची गमवावी लागली होती. आता उद्धव ठाकरेही सासरवाडीमुळेच अडचणीत आलेत तर त्यामुळे त्यांचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
जावयामुळे मनोहर जोशींची खुर्ची गेली
नातेवाईकांमुळे खुर्ची गमावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात पहिले मनोहर जोशींचा(Manohar Joshi) नंबर लागतो. जोशींच्या मुलीचे मिस्टर गिरीश व्यास यांच्यामुळे जोशींना आपलं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. १९९८ मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पुण्यात कर्वे रोडसारख्या प्राईम एरिआत त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती. पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा या इमारतीसंबंधीची फाईल जोशींसमोर आली तेव्हा जोशींनी शेरा बदलला. भूखंडाचं आरक्षण बदललं अन् तिथेच जोशी अडकले.
मनोहर जोशींनी भूखंडाच्या आरक्षणाचा शेरा बदलला. निगेटिव्हची फाईल पॉझिटिव्ह करुन घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. कोर्टानं मनोहर जोशींवर ताशेरे ओढले. इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मनोहर जोशींना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी(Balasaheb Thackeray) अवघ्या एका ओळीची चिठ्ठी पाठवली. राजीनामा द्या, अशा मजकुराची एकच ओळ बाळासाहेबांनी चिठ्ठीत लिहिली. मनोहर जोशींनी राजीनामा दिला असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी सांगितले. तसेच जोशींसारख्या उच्चशिक्षित मुख्यमंत्र्यानं आपल्या जावयाच्या फायद्यासाठी एका शाळेचं आरक्षण बदललं, हे संतापजनक आहे असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले होते तर बाळासाहेब या प्रकरणानंतर कित्येक महिने जोशींशी बोललेही नव्हते असंही सांगितलं जातं.
सासूमुळे अशोक चव्हाणांनी गमावलं मुख्यमंत्रिपद
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले, पण त्यानंतर २०१० मध्ये आदर्श हाऊसिंग घोटाळा समोर आला आणि चव्हाण गोत्यात आले. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवांसाठी एक भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. शहीद सैनिकांच्या पत्नींसाठी कल्याणकारी योजना राबवायला हा भूखंड होता. हा भूखंड मुंबईच्या पॉश किंवा मोक्याच्या समजल्या जाणाऱ्या कुलाबा परिसरात आरक्षित होता. पण लष्करासाठी आरक्षित भूखंडावर रहिवासी इमारत उभारण्यात आली. इथेही भूखंडाचं आरक्षण परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप झाला. आता याहून धक्कादायक म्हणजे जी इमारत बांधली त्यात राजकारणी, काही पोलिस अधिकारी, सरकारी बाबू, काही उद्योजक यांचे फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं. याच इमारतीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासू भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मा यांच्या नावावर दोन फ्लॅट असल्याचं उघड झालं. इमारतीशी संबंधित फाईल्स क्लिअर करण्याच्या बदल्यात अशोक चव्हाण यांनी आदर्शमध्ये तीन बेनामी फ्लॅट मिळवले असा आरोप झाला.
उद्धव ठाकरेंचं काय होणार?
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे म्हणजे रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीनं कारवाई केली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंवर हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप झाले आहेत. आतापर्यंत मनोहर जोशी आणि अशोक चव्हाण या दोन मुख्यमंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांमुळे आपलं मुख्यमंत्रीपद गमावलं होतं. त्यामुळेच मेहुण्यामुळे अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.