दिवा: ज्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि धर्मवीर आनंद दिघेचा वारसा जपत शिवसेना तळागाळार्पयत पोहचविण्यासाठी 40 वर्षे खस्ता खाल्ल्या. त्या शिंदे साहेबांना आणि शिवसेनेच्या आमदारांना कोण रेडे म्हणत आहेत. तर त्यांचे मृतदेह येतील अशी टिका करीत आहे. जे टिका करीत आहेत. ते साधा नगरसेवक आणि आमदारही निवडून आणू शकत नाही. त्याचा आमदारांच्या जोरावर बोलणारे पुन्हा खासदार पदी निवडून आले अशी टिका संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
दिवा येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेसमोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज एक सभा घेण्यात आली. या सभेच्या प्रसंगी खासदार शिंदे यानी उपरोक्त टोला खासदार राऊत यांना लगावला आहे. याप्रसंगी शैलेश पाटील, दीपक जाधव, अमर पाटील, उमेश भगत, आदेश भगत, गणेश मुंडे, राजेंद्र साप्ते, गणेश कांबळे, राजेश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, शिंदे साहेबांनी असा निर्णय का घेतला. त्यांच्या सोबत 50 पेक्षा जास्त आमदार का गेले. काही तरी कोणाचे तरी कुठे तरी चुकत असेल. सामान्य जनतेप्रमाणो शिवसैनिकांसह शिवसेनेच्या आमदारांच्या मनातील खदखद शिंदे साहेबांनी बाहेर काढली. शिवसेनेच्या आमदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे. तेव्हा तेच त्यांच्यासोबत गेले. शिंदे साहेबांना पायाला भिंगरी बाधून अहोरात्र शिवसेनेसाठी काम केले आहे. मी लहान पणापासून पाहतो. ते घरी कधी यायचे आणि कधी जायचे हे आम्हाला कळायचे नाही. इतके संघटनेच्या कामात व्यस्त होते. केरळ, पश्चीम महाराष्ट्रातील आणि रायगडमधील पूराच्या वेळी शिंदे यांनी लोकांना मदत केली.
दिव्यावरही जेव्हा संकट आले तेव्हा शिंदेसाहेबच पुढे होते. ग्रामीम भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला वरती येऊ दिली नाही. वारंवार अन्याय केला. त्यामुळेही खदखद निर्माण झाली याकडेही खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले. या समर्थन सभेला शिंदे समर्थकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी उपस्थितांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.