मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ५ दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स संपला नाही. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला २०० हून अधिक जागांचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मजबूत संख्याबळ असतानाही महायुतीकडून सरकार स्थापनेस दिरंगाई का होतेय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यात भाजपाकडून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगण्यात आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदी-शाहांचा निर्णय मान्य असेल असं सांगून भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रिपद ऑफर करण्यात आले. परंतु शिंदे यांच्याकडून दोन्ही प्रस्ताव नाकारण्यात आले. जर मला मुख्यमंत्री बनवता येत नसेल तर महायुती सरकारचा निमंत्रक म्हणून जबाबदारी द्यावी. त्याशिवाय श्रीकांत शिंदे, जे सध्या लोकसभेत खासदार म्हणून आहेत त्यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे ठेवला आहे.
शिंदे यांच्याकडून आलेल्या या प्रस्तावावर भाजपा सकारात्मक असल्याचं कळतंय. पडद्यामागे घडणाऱ्या या राजकीय हालचालींमुळे राज्यात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडत आहे. ठाण्यातील पत्रकार परिषदेत शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली. सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय आहे. मला अडीच वर्षे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल असं सांगून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला.
श्रीकांत शिंदे पक्षातील तरूण नेते
श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. ते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राजकारणात येण्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर सुरू केले. त्यांनी MBBS पदवीनंतर MS ऑर्थोपेडिक्स शिक्षण घेतले. २०१४ साली श्रीकांत शिंदेंनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली तेव्हापासून आजपर्यंत ते संसदीय कार्यप्रणालीत काम करतायेत. २०१४, २०१९ आणि २०२४ या सलग ३ टर्ममध्ये ते खासदार म्हणून निवडून आले आहेत.
एकनाथ शिंदे पक्ष संघटना वाढीवर भर देणार?
२५ नोव्हेंबरला भाजपाच्या वरिष्ठांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. तेव्हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राबाहेर पडू इच्छित नाहीत, आपला पक्ष बळकट करण्याला त्यांचे प्राधान्य असेल, असे बैठकीतील चर्चांमध्ये समोर आले. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर पक्ष संघटना वाढीवर शिंदे लक्ष केंद्रीत करणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकांची ‘लढाई’ जिंकली असली तरीही सामनेवाल्याशी चाललेले ‘युध्द’ तार्किक शेवटापर्यंत नेले पाहिजे, असं शिंदे यांना वाटते. ती त्यांच्या पक्षाची राजकीय गरजच आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक आणि इतर काही बाबतीत पुष्कळ काम अजून बाकी आहे त्यामुळे एकनाथ शिंदे पक्षाकडे लक्ष देणार असल्याचीही चर्चा आहे.