मुंबई : सेना-भाजपात युती कायम असताना पूर्व उपनगरात सुरू असलेल्या भाजपा-सेना राड्यात सध्या सेनेचे विभागप्रमुख दत्ता दळवी विरुद्ध भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्यातील वाद शिगेला जात आहे. एकीकडे सेनेच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळत नाही. दुसरीकडे या राड्यामध्ये जखमी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार केला जात आहे. येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी नेत्यांसह पक्षातील कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सायंकाळी शिवाजी तलावाजवळ असलेल्या सह्याद्री विद्यामंदिर सभागृहामध्ये भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सोमय्या यांच्यासह पालिका गटनेते मनोज कोटक, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, भांडुप विभाग अध्यक्ष प्रवीण दहितुले यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.मुलुंडमध्ये शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यासारख्या विरोधी प्रसंगांना येत्या काळात सामोरे जात पालिकेत सत्ता आणायची असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्यासाठी सोमय्या यांनी आवाहन केले. या वेळी सेनेचे पदाधिकारी डॉ. चंद्रकांत पाटील आणि मनसे रोजगार सेनेचे उपविभाग संघटक मिलिंद करंजे यांनी भाजपात प्रवेश केला. तर दुसरीकडे या राड्यात जखमी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कारदेखील या वेळी करण्यात आला.एकीकडे यात सेना विभागप्रमुख दत्ता दळवी तर दुसरीकडे उत्तर पूर्व मुंबई खासदार किरीट सोमय्या असा सामना सुरू आहे. अशात दळवींच्या नेतृत्वाखाली सोमय्यांचा रावणदहनाचा कार्यक्रम उधळून लावण्यात आला. तर दुसरीकडे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना जामीन मिळू नये यासाठी सोमय्यांनी सेटिंग लावली आहे. त्यामुळे दोघांच्या वरचढीमध्ये नेतेमंडळी काय पाऊल उचलतात याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.दरम्यान, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेतली. मात्र सेनेकडून वरिष्ठ नेतेमंडळी फिरकताना दिसली नाही. (प्रतिनिधी)>सोमय्यांचा रावणदहनाचा कार्यक्रम उधळून लावण्यात आला. तर अटक शिवसैनिकांना जामीन मिळू नये यासाठी सोमय्यांनी सेटिंग लावली आहे.
दत्ता दळवी विरुद्ध सोमय्या यांच्यातील वाद शिगेला
By admin | Published: October 18, 2016 1:57 AM