औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेत अनेकविध मुद्दे मांडले. त्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत ठाम भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. तसेच यावेळी केलेल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी आपली मते रोखठोकपणे मांडली. मात्र, मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेनंतर आता शिवरायांसंदर्भातील विधानावर आक्षेप घेतला जात असून, राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. शिवरायांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरे सहभागी असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे.
श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर मोठे आरोप केले आहेत. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. जेम्स लेनला मदत करणारे पुरंदरे आणि त्यांना मदत करणारे राजसुद्धा महाराजांना बदनाम करण्याच्या कटात सहभागी आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी, अन्यथा राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशी श्रीमंत कोकाटे म्हणाले. तर आम्ही हा मुद्दा राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी नाही काढला, तर आम्ही सातत्याने हा मुद्दा मांडत असतो, असे कोकाटे यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केले.
महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांचे तुम्ही समर्थक कसे
राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर असावा आमचा काही संबंध नाही. फक्त महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांचे तुम्ही समर्थक कसे इतकाच आमचा सवाल आहे, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. तसेच तर जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे अधिकार राज ठाकरे यांना कुणी दिले, अशी विचारणाही कोकाटे यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीय द्वेष वाढत गेला. शरद पवार शाहू-फुले-आंबेडकर यांचे जाहीरपणे नाव घेतात. मात्र, छत्रपती शिवरायांचे घेत नाहीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील घराघरात शिवरायांचा इतिहास पोहोचवला. मात्र, केवळ नावावरून त्यांना मोठा विरोध करण्यात आला, असे राज ठाकरे म्हणाले होते.