मुंबई – लोकसभा निवडणुकीत मुलाला उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विखेंच्या भाजपमध्ये येण्याने नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे चिन्हे दिसत आहे. सलग पाच वेळा या मतदारसंघाने काँग्रेसच्या उमेदवाराला विधान सभेत पाठवले आहे. विशेष म्हणजे यात विखेंचा मोठा वाटा समजला जातो. मात्र आता विखे भाजपमध्ये गेले असल्याने यावेळी श्रीरामपूरची जनता 'निशाणी' बदलणार की 'उमदेवार' अशी चर्चा पहायला मिळत आहे.
भाजपमध्ये गेलेल्या विखेंकडे विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील युतीची जवाबदारी राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मेहनत घेणाऱ्या विखेंवर आता युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जवाबदारी असणार आहे. काँग्रेसमध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला होता. मात्र यावेळी त्यांना युतीच्या उमेदवारासाठी काम करावे लगणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर मधील मतदार यावेळी युतीच्या 'निशाणी'ला की काँग्रेसच्या 'उमेदवारा'ला मत टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना २१ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे हीच परिस्थिती विधानसभेत राहिले तर काँग्रेसची अडचण वाढू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरचे राजकरण शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याभोवती फिरत आहे. त्यामुळे यावेळी हेच श्रीरामपूरकर कुणाला पाणी पाजणार याची चर्चा पहायला मिळत आहे.
१९९५ पासून २०१४ पर्यंत श्रीरामपूर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत विखे पिता-पुत्र यांच्या भाजपमध्ये येण्याने युतीची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यात प्रत्येकवेळी काँग्रेसचा प्रचार करणारे विखे आता युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे यावेळी श्रीरामपूरमधील लढत महत्त्वाची ठरणार आहे.
लोकसभा निवडणुक २०१९
सदाशिव लोखंडे ( शिवसेना ) - ८६ हजार ६३९
भाऊसाहेब कांबळे ( काँग्रेस ) - ६५ हजार १८१
विधानसभा निवडणूक २०१४
भाऊसाहेब कांबळे ( काँग्रेस ) - ५७ हजार ११८
भाऊसाहेब वाकचौरे ( भाजप ) - ४५ हजार ६३४
लहू कानडे ( शिवसेना ) - ३७ हजार ५८०
सुनिता गायकवाड ( राष्ट्रवादी ) - ३५ हजार ०९५