सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ऐन हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, मका, बाजरी आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी औरंगाबादेत आले होते. संकटं येत असतात, परंतु त्यांच्याशी आपल्याला लढायचे आहे. तुमचे नुकसान झालेले असले तरी तुम्ही धीर सोडू नका, आपण सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले.
जे सुरू आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे, असा विश्वास ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच यावेळी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला इशारा देखील यावेळी दिला. याच दरम्यान आता शिंदे गटाच्या खासदाराने त्यांना खोचक सवाल विचारला आहे. "उद्धव ठाकरेंनी अवघ्या 24 मिनिटांत नेमकी काय पाहणी केली?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "धनुष्यबाण चिन्ह हे बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेलाच मिळेल" असा विश्वासही व्यक्त केला आहे.
"ते परिस्थितीला कसे सामोरे जाणार त्यांनाच विचारा"
खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी "विरोधी पक्षाचा नेता सरकारवर टीका करतोच. त्याचं ते काम असतं. सरकार म्हणून चांगल्या प्रकारचं काम या सरकारने तीन महिन्यात केलं आहे. हे तुम्ही पाहत आहात. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मीडिया होता. तुम्हीच सांगता त्यांनी 24 मिनिटांचा दौरा केला. या 24 मिनिटांत सर्व परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. त्यांनी या 24 मिनिटांत काय पाहणी केली असणार? ते परिस्थितीला कसे सामोरे जाणार त्यांनाच विचारा" असं म्हटलं आहे.
"धनुष्यबाण चिन्ह हे बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेलाच मिळेल"
"कोणताही पक्ष असावा राज्यातील जनता सुखी व्हावी हे सरकारचं काम आहे. ते काम हे सरकार करत आहे. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार सत्तेत आहे. भाजपासोबत आहे. त्यामुळे हे सरकार निश्चित जनतेच्या समस्या सोडवण्यात यशस्वी होईल. धनुष्यबाण मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायदेशीर लढाई लढत आहे. धनुष्यबाण चिन्ह हे बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेलाच मिळेल" असं देखील श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"