औरंगाबाद : दहावीतील मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पडेगाव परिसरात उघडकीस आली. तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून, या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. सिडकोतील श्रुती कुलकर्णी प्रकरणाची ही पुनरावृत्ती असल्याची चर्चा आहे.ऋतुजा ज्ञानेश्वर गायके (रा. पोलीस कॉलनी, पडेगाव) औरंगपुऱ्यातील शिशुविहार विद्यालयात दहावीत शिकत होती. ऋतुजाचे वडील शिऊर येथील संत बहिणाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक आहेत. ‘काही दिवसांपासून एक तरुण ऋतुजाचा पाठलाग करीत असे. त्याच्या छेडछाडीला ती वैतागली होती, हे समजल्यानंतर आम्ही नातेवाईकांनी युवकाला घरी जाऊन त्याला समजावले होते, तसेच पोलिसांतही तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी त्याला समजावले नाही,’ असे तिचे मामा काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काय घडले होते रविवारी?दिवाळीच्या सुट्ट्यांत ऋतुजा गंगापूर येथे मामाच्या गावी गेली होती. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ती घरी आली. त्यानंतर आईने खरेदीसाठी ऋतुजाला दुकानात पाठविले. मात्र, बराच वेळ झाला तरी ती न आल्याने वडिलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी दुकानालगत गल्लीतून ऋतुजा व तो युवक बाहेर पडताना वडिलांना दिसले. त्यानंतर सोमवारी ऋतुजाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
औरंगाबादमध्ये श्रुती कुलकर्णी प्रकरणाची पुनरावृत्ती?
By admin | Published: November 18, 2015 2:14 AM