शालिग्राम पवार/ऑनलाइन लोकमतशिरसोली, दि. 16 - सुज्ञ नागरिक व समाजाने पुढाकार घेतल्यास काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरसोली (ता.जळगाव) येथील मूकबधिर नीलेश व तोंडापूर (ता.जामनेर) येथील अपंग पुष्पा यांचा विवाह सोहळा होय. या दोघांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेत या दोघांचे लग्न जुळविले आणि १६ जुलै रोजी विवाह सोहळा शिरसोली येथील पाच देवी मंदिरावर मोठ्या उत्साहात होत आहे. मूकबधीर असलेल्या नीलेश याचे वडील तुळशीराम पाटील यांचे निधन झाले आहे. नीलेश हा जैन इरिगेशन या कंपनीत कार्यरत आहे. सोज्वळ स्वभावामुळे तो सर्वांचाच लाडका आहे. कुणाच्याही सुख-दु:खात तो सहभागी होत असतो. मात्र मूकबधिर असल्याने त्याच्या विवाहाची सर्वांनाच चिंता होती. वधूचा शोध सुरू होता. तोंडापूर येथील भाऊराव पाटील यांची कन्या पुष्पा व नीलेशबाबत प्रतिष्ठित नागरिकांनी बोलणी केली व त्यांना त्यात यश आले. दोघांच्या विवाहास मंडळी राजी झाली आणि १६ जुलै रोजी विवाह सोहळा निश्चित झाला. नीलेशचा विवाह होणार असल्याने ग्रामस्थांना आनंद झाला आहे. त्यामुळे हा सोहळा मोठ्या थाटात करण्यात येणार आहे. शिरसोली, तोंडापूर येथील तसेच जळगावातील प्रतिष्ठित मंडळीही या सोहळ्यात सहभागी होणार असून, दोघांना आशीर्वाद देणार आहेत.
समाजाच्या पुढाकाराने शिरसोलीत दिव्यांगांचे शुभमंगल
By admin | Published: July 16, 2017 7:59 AM