आसीनगर झोन कार्यालय : नारेबाजी, खिडकीची काच फोडली नागपूर : अनियमित पाणीपुरवठ्याने संतापलेल्या नारी प्रभागातील नागरिकांच्या असंतोषाचा बुधवारी उद्रेक झाला. दुपारी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आसीनगर झोन कार्यालयावर मोर्चा काढला. ओसीडब्ल्यूच्या विरोधात नारेबाजी केली. इतकेच नव्हे तर कार्यालयातील एका खिडकीची काच फोडून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर प्रकरण शांत झाले. नारी प्रभागातील सहयोगनगर, समर्थनगर, कबीरनगर येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. टँकरही नियमित येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव दूषित पाणी वापरावे लागत आहे. याबाबत झोनच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी करण्यात आल्या; परंतु काहीही कारवाई झाली नाही. अखेर संतापलेल्या नागरिकांनी आसीनगर झोन कार्यालयात धडक दिली. ओसीडब्ल्यूच्या विरोधात नारेबाजी केली. आसीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनीसुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असल्याचे मान्य केले. या प्रश्नासाठी काही नागरिक बुधवारी कार्यालयात आले होते. त्यांनी नारेबाजी केली; परंतु कुठलीही तोडफोड केली नाही. त्यांची समजूत काढल्यानंतर ते परत गेले. (प्रतिनिधी)
पाण्यावरून गदारोळ
By admin | Published: June 12, 2014 1:24 AM