ठाणे : किरकोळ आणि मोठ्या दुरुस्तीसाठी बंद असलेल्या टीएमटीच्या बस आता लवकरच दुरुस्त होणार आहेत. सोमवारी होणाऱ्या परिवहनच्या बैठकीत बसदुरुस्तीसाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्याचे सुमारे १९ प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत. तसेच मागील १५ वर्षे स्क्रॅप झालेले साहित्यही भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीएमटीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी आता परिवहन प्रशासनाबरोबर पालिकेनेदेखील पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, मागील कित्येक वर्षे धूळखात पडलेल्या आणि किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात असलेल्या बस आता दुरुस्त होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सोमवारी होणाऱ्या परिवहनच्या बैठकीत बसदुरुस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदीच्या महत्त्वाच्या प्रस्तावाबरोबरच डिझेलवर चालणाऱ्या बससाठी २५ लाखांचे साहित्य खरेदी, यामध्ये इंजीन, गिअर स्पेअर पार्ट्स, फिल्टर, बेअरिंग आदींचा समावेश आहे. तसेच नव्याने दाखल झालेल्या व्होल्वो बसकरिता १० लाखांचे ट्युबलेस टायर खरेदी, स्टार्टर, अल्टरनेटर व त्यांचे आॅटो इलेक्ट्रिक सुटे भाग खरेदीसाठी २१ लाख, दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी २५ लाख, सुटे भाग खरेदीसाठी २५ लाख, विविध ग्रेडचे इंजीन आॅइल खरेदीसाठी ९० लाख, टाटा बसच्या नवीन इंजीन खरेदीसाठी ४१ लाख आदींसह इतर महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव मंजूर झाल्यास परिवहनमध्ये बंदावस्थेत असलेल्या काही बस आता रस्त्यावर धावतील, अशी आशा व्यक्त होत आहे. याशिवाय, मागील कित्येक वर्षे वागळे आगारात धूळखात पडलेले स्क्रॅप मटेरिअलदेखील आता भंगारात काढले जाणार आहे. त्याचा प्रस्तावदेखील सोमवारच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. याबाबत महासभेत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
टीएमटीच्या बंद बस आता लवकरच दुरुस्त होणार
By admin | Published: July 18, 2016 3:22 AM