“राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार तीनच चेहरे आश्वासक; हे सरकार उलथवणे कर्तव्य”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 02:03 PM2024-07-25T14:03:42+5:302024-07-25T14:04:03+5:30
Shyam Manav News: महाराष्ट्रातील महायुती सरकार उलथवून लावा, असे आवाहन करण्यात आले.
Shyam Manav News: महाराष्ट्रात आपल्यासमोर तीनच आश्वासक चेहरे आहेत. राहुल गांधी यांचे शब्द काँग्रेस पक्षात अंतिम असतात. उद्धव ठाकरे यांची बांधिलकी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांशी असून, त्यांच्याशी अनेक वेळेला संवाद झाला आहे. शरद पवार यांना आपण सर्व पन्नास वर्षांपासून ओळखतो. त्यांची वैचारिक भूमिका सर्वांना माहिती आहे. पक्ष फुटूनही ते भाजप समोर झुकलेले नाही, म्हणून आपण या तिघांवर विश्वास ठेऊ शकतो, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी स्पष्टपणे सांगितले.
हे शेठजी व भटजींचे सरकार आहे. हे शेठजींची संपत्ती वाढवणारे आणि गरिबांना आणि गरीब बनवणारे सरकार आहे. त्यामुळे सरकार केंद्राचे असो किंवा महाराष्ट्राचे, ते सरकार उलथवून लावणे आपले कर्तव्य आहे, असा एल्गार श्याम मानव यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकार उलथवून लावा, असे सांगत श्याम मानव यांनी आपला पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
आपण सर्व पुन्हा आंदोलन करायला मोकळे आहोत
महाविकास आघाडी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही, तर आपण सर्व पुन्हा आंदोलन करायला मोकळे आहोत, असेही श्याम मानव यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडकवण्यासाठी भाजपने गृहमंत्रिपदावर असलेल्या अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. मात्र देशमुख यांनी ती ऑफर न स्वीकारता १३ महिने तुरुंगात राहणे पसंत केले, असा मोठा दावा श्याम मानव यांनी केला होता.
देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
श्याम मानव यांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. श्याम मानव यांच्या वक्तव्याला उत्तर देताना हे ही सुपारीबाजाच्या नादी लागले का, असा सवाल विचारला. तसेच मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.