Shyam Manav Threat: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) अचानक चर्चेत आले आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अलीकडेच बागेश्वर बाबांना आव्हान दिले होते. ते आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलेही होते. यानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता अंनिसचे श्याम माधव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे सांगितले जात आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाइलवर धमकीचे संदेश आल्याची माहिती देण्यात आली आहे. तुमचा नरेंद्र दाभोळकर करून टाकू, रात्री ११ वाजेनंतर तुम्ही जिवंत राहणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मानव यांच्या समर्थकांनी पोलिसांत तक्रार दिली. ही बाब गंभीरतेने घेतली व त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. श्याम मानव यांच्यासोबत आधी दोन सुरक्षारक्षक असायचे. आता त्यात आणखी दोन बंदूकधारी तसेच ३ पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहे. बागेश्वर बाबा यांना श्याम मानव यांनी दिले होते आव्हान
लोकांच्या मनातले ओळखण्याची तसेच अनोळखी व्यक्तीविषयी माहिती सांगण्याची दिव्यदृष्टी आपल्याकडे असल्याचा दावा बागेश्वर बाबा यांनी केला होता. याला श्याम मानव यांनी आव्हान दिले. बागेश्वर बाबा उर्फी धीरेंद्र महाराज नागपुरात आले असताना श्याम मानव यांनी त्यांना आव्हान दिले होते. दिव्य शक्ती सिद्ध करून दाखवल्यास त्यांना ३० लाखांचे बक्षीस देऊ, असे ते म्हणाले होते. तसेच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार, बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला होता. यानंतर मानव यांना सातत्याने धमक्या येऊ लागल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मी कधीही धर्म किंवा देवाविरुद्ध काहीही बोललो नाही. तसेच धीरेंद्र शास्त्री महाराजांबद्दल कधीही वाईट शब्द बोललो नाही. मी फक्त त्या लोकांच्या विरोधात आहे, जे धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करतात. तसेच धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणार्या अंधश्रद्धांबद्दल बोलतो, असे श्याम मानव यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"