ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 20 - शीना बोरा हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून आरोपी श्याम रायला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं आहे. विशेष सीबीआय न्यायलयाने श्याम रायला माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी दिली आहे. आरोपी श्याम रायने स्वत: माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. गुन्ह्या संदर्भात मला महत्वाचे खुलासे करायचे असून, मला माफीचा साक्षीदार बनायचे आहे असं दोन पानी पत्रच श्याम रायने न्यायालयाला लिहिलं होतं.
शीना बोरा हत्या प्रकरणी मी सर्व खुलासा करणार आहे. माझी आणि इतरांची या हत्येत काय भुमिका होती मी खुलासा करेन असं श्याम रायने न्यायालयात सांगितलं आहे. शीना बोरा हत्येप्रकरणी सर्वात पहिली अटक श्याम रायला झाली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर म्हणून काम करणा-या श्याम रायला ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर ख-या अर्थाने या हत्येचा उलगडा झाला होता.
श्याम रायमुळेच झाला हत्येचा उलगडा -
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी २१ ऑगस्ट २०१५ रोजी सर्वात आधी चालक श्यामवर राय याला अटक केली होती. त्याने शीना बोराच्या हत्येचा खळबळजनक खुलासा पोलिसांसमोर केला होता. त्याने सांगितले की, इंद्राणी मुखर्जीने २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करून मृतदेह एक दिवसानंतर २५ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील गागोदे गावाजवळ जंगलात फेकून दिला होता. श्याम रायने दिलेल्या माहितीची पोलिसांनी खातरजमा सुरू केली. त्यात त्यांना २३ मे २०१२ रोजी जंगलात एका अज्ञात मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीसह तिचा माजी पती संजीव खन्ना व नंतर १९ नोव्हेंबर २०१५ रोजी पीटर मुखर्जीला अटक केली होती. शीना बोरा ही पीटरची मुलगी होती.
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण-
- एप्रिल 2012 मध्ये इंद्राणीने दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांच्या मदतीने आपली मुलगी शीनाची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह रायगडजवळच्या जंगलात टाकून दिला होता.
- शीना ही इंद्राणीला पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती.
- ऑगस्ट 2015 मध्ये मुंबईपासून 80 कि.मी. अंतरावर रायगडच्या जंगलात शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते.
- डीएनए चाचणीत इंद्राणीच्या रक्ताचे नमुने शीनाच्या हाडांशी जुळले. त्यानंतर शीनाची उंची पाच फूट तीन इंच होती तसेच गळा आवळून शीनाचा मृत्यू झाला असे या अहवालात म्हटले होते.
- शीना बोरा हिच्याशी साखरपुडा होऊन लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या राहुल मुखर्जी याने शीना गायब होताच तिचा शोध सुरू केला होता. वडील पीटर यांच्याकडे तो वारंवार विचारणा करीत होता. शीनाशी प्रत्यक्ष बोलणे करून देण्याची विनंती करीत होता. परंतु पीटरने ती विनंती फेटाळली होती.
- शीना व पीटर यांच्यात आर्थिक वाद होते त्यातून शीनाची हत्या करण्यात आली. तसेच केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल याच्याशी असलेल्या संबंधामुळेच शीनाची हत्या करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
- पीटरचा मुलगा राहुल आणि इंद्राणीची मुलगी शीना हे सावत्र बहीण-भाऊ असल्यामुळे त्यांचे संबंध इंद्राणीसह पीटर या दोघांनाही मान्य नव्हते.
- इंद्राणीला राहुल आवडत नव्हता. शीनासोबत असलेल्या संबंधांमुळेच खरेतर राहुलबद्दल तिला राग होता. त्यामुळे शीनाची हत्या केल्यानंतर तिच्या मोबाइल फोनवरून पाठविलेले संदेश वा शीना असल्याचे भासवून एकदा प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही राहुलने आपल्याला फक्त शीनाशी एकदा बोलायचे आहे. तिचा आवाज ऐकून तिने नकार दिल्यानंतर आपण तिच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, असे त्याने पीटरला पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते. परंतु त्याची ही मागणी पीटरने साफ फेटाळली होती.
- त्यामुळे सीबीआयने इंद्राणीसह पीटर मुखर्जी याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.