सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- महाड येथील दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या कारमधील व्यक्तींमध्ये सानपाड्यामधील दत्ताराम मिरगल यांचाही समावेश आहे. ते गुहागरला आजारी चुलत भावाला भेटायला गेले होते. सर्व नातेवाइकांसह तवेरा कारने परत येत असताना हा भीषण अपघात घडला आहे.महाड येथील दुर्घटनेमुळे सानपाडा सेक्टर ५ येथील मंगलमूर्ती सोसायटीतदेखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील रहिवासी दत्ताराम मिरगल (६१) हे त्यांच्या चुलत भावाला भेटायला गुहागरमधील जांभोडी या गावी गेले होते. परंतु नातेवाइकांसह ते ज्या तवेरा कारने परत मुंबईकडे येत होते, ती कार पुलाच्या दुर्घटनेत वाहून गेली आहे. त्यांच्यासोबत सांताक्रुझ व मुंबईच्या इतर भागातील आठ नातेवाईकदेखील होते. त्यांनीच गावी जाऊन येण्यासाठी तवेरा गाडी केली होती. त्यामुळे गावी जातानादेखील त्यांनी दत्ताराम यांना सोबत बोलावले होते. परंतु कारऐवजी ते खासगी ट्रॅव्हल्सने गावी गेले होते. येताना मात्र सर्व नातेवाइकांनी सोबत मुंबईला जाण्याचा हट्ट केल्यामुळे ते तवेरा कारमधून येत होते. यादरम्यान महाड येथे सावित्री नदीवरील वाहून गेलेल्या पुलासोबत त्यांचीही कार वाहून गेली. या कारमधील माय-लेकींचे मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडले आहेत. शेवंती मिरगल व संपदा वाझे अशी त्यांची नावे असून, शेवंती या सानपाड्याचे दत्ताराम मिरगल यांच्या काकू आहेत. तवेरा कारमधील इतर प्रवाशांबाबत मात्र अद्याप काहीच माहिती हाती लागलेली नाही. त्यामुळे मिरगल यांच्या मुलांसह, निकटवर्तीय तसेच स्थानिक नगरसेवक सोमनाथ वास्कर हे तीन दिवसांपासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत. >दत्ताराम मिरगल यांनी गणपतीसाठीदेखील गावी जाण्याकरिता एसटीचे बुकिंग करून ठेवले होते. गणेशोत्सव काळात प्रतिवर्षी ते गावी जात असत. मात्र यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे