चवथ्या आरोपीस सात वर्ष शिक्षा, पाचवा आरोपी निर्दोषअकोला, 27 - मलकापूरचे सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश्वर देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच चवथ्या आरोपीस सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून पाचव्या आरोपीची संशयावरुन निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील एका आरोपीस २५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला.मलकापूर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच सिद्धेश्वर देशमुख हे त्यांचे मित्र डिगांबर पाटील आणि अनिल अदनकार यांच्यासोबत २३ आॅगस्ट २०१३ रोजी मलकापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर असताना त्यांच्यावर मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड आणि नीलेश काळंके यांनी वाद घालत धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता, या हल्ल्यानंतरही सिद्धेश्वर देशमुख यांनी मारेकऱ्यांच्या हातातून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर बल्लू मार्कंड याने देशमूख यांच्यावर चार गोळया झाडल्या तर काळंकेने धारदार शस्त्रांनी हल्ला सुरुच ठेवला. यामध्ये सिद्धेश्वर देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या प्रकरणाची तक्रार अनिल रामभाऊ अदनकार यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कें ड, अविनाश सुरेश वानखडे, नीलेश काळंके, विष्णू नारायण डाबके आणि डिगांबर हरिभाऊ फाटकर,या पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३४१, १२०, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या हत्याकांडाचा तपास खदानचे तत्कालीन ठानेदार शैलेष सपकाळ यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी वाघमारे यांच्या न्यायालयाने १८ साक्षीदार तपासले, यामधील २ प्रत्यक्षदर्शी तर ३ अन्य साक्षीदार फीतूर झाले. मात्र त्यानंतरही चारही आरोपींविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यावरून न्यायालयाने मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड, निलेश काळंके आणि अविनाश वानखडे यां तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर विष्णू नारायण डाबके याला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. डिगांबर फाटकर याची संशयावरून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील बल्लू मार्कंड याला २५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा साहाय्यक सरकारी वकील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विनोद फाटे यांनी कामकाज पाहीले. तर आरोपीच्यावतीने औरंगाबाद येथील अॅड. लढ्ढा यांनी कामकाज पाहीले.
सिध्देश्वर देशमूख हत्याकांड तीन आरोपींना दुहेरी जन्मठेप
By admin | Published: February 27, 2017 6:48 PM