मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे याच्या टोळीचे कनेक्शन उघड झाले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेने सप्रेसह त्याच्या अंबरनाथ आणि पनवेल येथील साथीदारांना शुक्रवारी अटक केली. आरोपींनी शूटर्सना शस्त्र पुरविल्याचे समजते.
नितीन सप्रे (३२) याच्यासह अंबरनाथमधील संभाजी पारधी (४४), प्रदीप ठोंबरे (३७), चेतन पारथी (२७) आणि पनवेलमधील राम कनोजिया (४३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. टोळीप्रमुख सप्रे अकोटमधील पसार आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होता. नितीन सप्रेवर हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद आहे. नितीन हा रामच्या मदतीने त्याची टोळी चालवत होता. शुभमपाठोपाठ तो झिशान अख्तरच्या संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरून या कटात सहभागी होत, त्याने साथीदारांच्या मदतीने तीन बंदुका मारेकऱ्यांना दिल्या. ज्या गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत.