मुंबई : १९९३ बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या फाशीबाबत भाईजान सलमान खानने केलेल्या वादग्रस्त टिष्ट्वटने त्याच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडिमार सुरू झाला. त्यामुळे रविवारी सकाळपासून वांद्रे पोलिसांनी एसआरपीएफच्या जवानांसह त्याच्या घराभोवती कडक बंदोबस्त तैनात केला. अशात भाईजानच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वेळी एक वयोवृद्ध महिला जखमी झाली. वांद्रे पश्चिमेकडील कार्टर रोड परिसरात सलमान खान कुटुंबीयांसह राहतो. सलमानने शनिवारी रात्री बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या फाशीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रविवारी सकाळी १० वाजल्यापासून पोलिसांनी भाईजानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटभोवती कडक पहारा ठेवला होता. वांद्रे पोलीस ठाण्याचे एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा अधिकाऱ्यांसह ५०हून अधिक पोलिसांचा फौजफाटा सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात होता. सायंकाळी ५च्या सुमारास मुंबई भाजपा युवा कार्यकर्त्यांनी भाईजानच्या घरावर हल्लाबोल केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. २०० ते ३०० भाजपा युवा कार्यकर्ते या वेळी असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला. पोलिसांनी एसआरपीएफची कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. यात एक वयोवृद्ध महिला जखमी झाली. तिला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल अर्ध्या तासानंतर पोलिसांनी या जमावावर नियंत्रण आणून भाजपाच्या २० जणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत हा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. तर दुसरीकडे रात्री साडे आठच्या सुमारास समाजवादी पार्टीचे १०० ते १५० युवा कार्यकर्ते सलमान खानने मोकळेपणाने मांडलेल्या विचारांचे समर्थन करण्यासाठी आणि त्याचा सत्कार करण्यासाठी त्याच्या घराजवळ पोहोचले. प्रत्येकाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली यास आमचा विरोध नाही. तथापि, यावर सलमानने स्वतंत्रपणे मांडलेले मत चुकीचे नसल्यामुळे आम्ही सलमानच्या टिष्ट्वटचे स्वागत करत असल्याचे समाजवादी युवा पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी सांगितले.साताऱ्यात शिवसेनेचे आंदोलनसलमानच्या विधानाविरोधात साताऱ्यात शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटली. येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहात शिवसैनिकांनी आंदोलन छेडत, सलमानच्या पोस्टरला काळे फासले. तसेच सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा खेळ बंद पाडला. तर सलमानच्या विधानाला महत्त्व न देता, त्याकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘बजरंगी’मुळे माफी‘बजरंगी भाईजान’ या सलमानच्या चित्रपटाने दोन आठवड्यांतच २०० कोटींचा गल्ला केला आहे. चित्रपटाला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत असताना ‘त्या’ वादग्रस्त टिष्ट्वटमुळे विपरीत परिणाम होऊ नये म्हणूनही कदाचित सलमानने माफी मागत ते टिष्ट्वट मागे घेतले असावे, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये होती.सलमानचा माफीनामापिता सलीम यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला विधान मागे घेण्यास सांगितले. माझ्या ट्विटमुळे गैरसमज पसरू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. मलाही याकूब निष्पाप आहे, असे वाटत नाही. त्यामुळे मी माझे ट्विट मागे घेतो आणि सपशेल माफी मागतो. टायगरला फाशी व्हावी, असे मला वाटत आहे आणि तसेच मी ट्विटमध्ये म्हटले होते. पण त्यामुळे जर गैरसमज झाला असेल, तर मला क्षमा करा. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे सलमानने नंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (प्रतिनिधी)
टिष्ट्वटनंतर ‘गॅलेक्सी’ला पोलिसांचा वेढा
By admin | Published: July 27, 2015 1:23 AM