ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 20- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील भगवती मंदिराच्या शिखरावर दरड काढण्याचे काम २१ ते २७ जून असे सात दिवस सुरू राहाणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी देवीचे दर्शन सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कार्यकारी अभियंता सुरज कंकरेजा व उपअभियंता केदारे यांनी दिली.
सप्तशृंगी गडावर भगवती मंदिर परिसरात व उतरत्या पायऱ्यांच्या बाजूला १२ जून रोजी दरड कोसळण्याची घटना घडली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक बसविण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व डोंगरास दरड प्रतिबंधात्मक लोखंडी जाळीचे आवरण बसविणारे तंत्रज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून पडलेली दरड उतरविण्यासाठी व दरड प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. ज्यांनी ह्या जाळ्या बसविण्याचे काम हाती घेतले होते. अशा तंत्रज्ञान व प्रशिक्षिक कामगारांची रेसक्यू टीम दरड काढण्यासाठी आली असून संरक्षक जाळ्यांवर छोटे छोटे दगड पडले असून ते काढण्याचे काम सूरू झाले आहे व मोठी दरड काढण्यासाठी सहा ते सात दिवस लागणार आहे.
राज्यातील विविध भागातून येणाया भाविकांना व पर्यटकांना देवी दर्शनाची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्या पायरीजवळ देवीची प्रतीमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळा उघडल्याने व दरड काढण्याचे काम चालू होणार असल्याचे कळल्याने सप्तशृंगगडावर व्यापारी बाजारपेठेत शूकशूकाट पाहायला मिळत आहे .