पुणे : दैनंदिन धावपळीत सिग्नल मोडणे आणि वनवे रस्त्यांना हरताळ फासण्यातही पुणेकरांनी आघाडी घेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाहतूक नियम केवळ नावालाच असतात; याची पुन्हा एकदा प्रचिती देत १ जानेवारी ते जुलै २०१६ अखेर दर महिन्यास तब्बल ३३ हजार ५८0 पुणेकरांनी सिग्नल जंपिंग केले असून याच कालावधीत दर महिन्यास सुमारे ५ हजार वाहनचालक वनवेमधून प्रवास करताना त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे. शहराचा गेल्या दशकभरात वेगाने विकास झाला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने शहरातील बहुतांश नागरिक स्वत:चे वाहन घेण्यावर भर देत असल्यने शहरातील वाहनांची संख्या ३१ लाखांच्यावर गेली असून त्यातील जवळपास ७० टक्के वाहने ही दुचाकी आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर सकाळी तसेच संध्याकाळी दुचाकींच्या रांगा लागत असल्याचे चित्र असून त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस नवीन विक्रम प्रस्थापित करीत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांनी अशा नियमभंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रफ्फुल सारडा यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागविली होती. यात दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै २०१६ अखेर वाहतूक पोलिसांनी सिग्नल मोडणाऱ्या तब्बल २ लाख ३५ हजार ०५४ वाहनांवर कारवाई केली आहे, तर याच कालवधीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यात वनवे करण्यात आलेल्या रस्त्यांवर नियमभंग करणाऱ्या तब्बल ५३ हजार ९६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>अडीच वर्षांत साडेसात हजार केसेसवाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अडीच वर्षांत शहरात तब्बल साडेसात हजार वाहनचालकांवर सिग्नल ब्रेकिंगची कारवाई करण्यात आली आहे. त्यात २०१४ मध्ये १ लाख ५२ हजार ०३३, २०१५ मध्ये ३ लाख ८९ हजार ११४, तर जुलै २०१६ अखेरपर्यंत २ लाख ३५ हजार ०५४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या अडीच वर्षांत या नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून ७ कोटी ८५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अवघ्या काही सेकंदासाठी पुणेकर दरवर्षी सरासरी अडीच कोटी रुपये वाहतूक पोलिसांच्या तिजोरीत जमा केले जात असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.>अडीच वर्षांत दीड लाख जणांचा वनवेला हरताळया अडीच वर्षांच्या कालावधीत तब्बल दीड लाख पुणेकरांनी वनवेच्या नियमालाही हरताळ फासला आहे. प्रामुख्याने शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये सर्वाधिक रस्ते वनवे करण्यात आलेले असून या भागातच ही कारवाई करण्यात आलेली आहे. वनवेमधून नियमभंग करणाऱ्यांविरोधात २०१४ मध्ये २९ हजार ८६८ केसेस, २०१५ मध्ये ७४ हजार ०६७, तर जुलै २०१६ अखेर ५३ हजार ९१६ केसेस नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामधून १ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला असल्याचे या माहितीमधून समोर आले आहे.
सिग्नल, वनवे धुडकाविण्यातही आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 12:58 AM