सांगली : सांगलीतील टोल एक दिवसही सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देत टोलविरोधात सर्वपक्षीय लढ्याचा निर्धार गुरुवारी बैठकीत करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत उद्या (शुक्रवारी) दुपारी एक वाजता सांगलीच्या टोलसंदर्भात बैठकीचे आयोजनही करण्यात आले असून, या बैठकीनंतर सर्वपक्षीय आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. सांगलीतील बायपास रस्ता व पुलाचे काम करणाऱ्या अशोका बिल्डकॉन कंपनीला न्यायालयीन निर्णयामुळे पुन्हा १६ वर्षे टोलवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याविरोधात आता सांगलीत आंदोलन उभारण्यात येत आहे. सांगलीच्या विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत टोलविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील आदी उपस्थित होते. आ. गाडगीळ म्हणाले की, सांगलीकरांना टोल भरावा लागणार नाही. शासन याप्रश्नी उच्च न्यायालयात जाईल. राजकारण न करता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सर्वपक्षीय निवेदन देऊन याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आग्रह धरला जाईल. टोलप्रश्नी यापूर्वी झालेल्या आंदोलनात दाखल झालेले कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात येईल. महापौर कांबळे म्हणाले की, एकही व्यक्ती एक पैसाही टोल देणार नाही. याप्रकरणी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आ. गाडगीळ यांच्यावर आहे. जनतेच्या भावना तीव्र असल्याने हा टोल रद्द झालाच पाहिजे.बापूसाहेब पाटील म्हणाले की, लवादाचा निर्णयच संशयास्पद आहे. साडेसात कोटींसाठी इतकी वर्षे टोल गोळा करून पुन्हा ही कंपनी ७२ कोटी रुपये मिळविण्यासाठी तयार झाली आहे. गिधाडांचे पानिपत करण्याची वेळ आली आहे. माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले की, शासनाने टोल बंद करण्याच्या परिपत्रकात व यादीत सांगलीच्या टोलचा समावेश केला नाही. सरकारला कंपनीची नुकसान भरपाई देणे अवघड नाही. त्यामुळे याबाबत शासनाने सोमवारपूर्वी हा विषय मिटवावा. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, टोलचे हे भूत जनतेच्या मानगुटीवर बसणार नाही, याची दक्षता शासनाने घ्यावी. सरकारला याप्रश्नी समज देऊन याबाबत पाठपुरावा आवश्यक आहे.शिवसेनेचे पृथ्वीराज पवार म्हणाले की, टोलविरोधात रस्त्यावरच्या लढ्यासाठी एक गट व न्यायालयीन लढाईसाठी एक गट आवश्यक आहे. यावेळी समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा, नगरसेविका स्वरदा केळकर, युवराज बावडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा अजिंक्य पाटील, बाळासाहेब कलशेट्टी, अॅड. अमित शिंदे, महेश पाटील, राष्ट्रवादीचे सागर घोडके, मनसेचे तानाजी सावंत, सुरेश दुधगावकर, आदित्य पटवर्धन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘ते’ प्रकरण नवरा-बायकोचं!कृती समितीचे सदस्य महेश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब किस्सा यावेळी उपस्थितांना सांगितला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील शासनाच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेचा क्रमांक एका अधिकाऱ्याकडे आपण मागितला. त्या अधिकाऱ्याने प्रकरणाचा क्रमांकही दिला. संकेतस्थळावर त्या क्रमांकाने तपासणी केली, तर एका नवरा-बायकोच्या वादाच्या प्रकरणाचा तो क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले. ही घटना त्यांनी सांगितल्यावर उपस्थितांत हशा पिकला. पालकमंत्र्यांशी आज चर्चा निमंत्रक साखळकर यांनी सांगितले की, सांगलीतील टोलप्रश्नी शुक्रवारी दुपारी एक वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत समितीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.
टोलविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
By admin | Published: August 06, 2015 10:51 PM