कमलाकर कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : दीर्घकाळ रखडलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणारे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या बदलीचे संकेत मिळत आहेत. नगरविकास विभागात मुख्य सचिव म्हणून त्यांची वर्णी लागण्याची शक्यता मंत्रालय सूत्राने व्यक्त केली.गगराणी यांनी वर्षभरापूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला. या काळात मेट्रो, नेरूळ-उरण रेल्वे मार्ग, नैना प्रकल्पाला गती दिली. साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेत पारदर्शकता आणली. महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. प्रकल्पग्रस्तांच्या गावांच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावला. विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात विमानतळ उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी २000 कोटींची विमानतळपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित ठेकेदारांना कामाच्या वर्कआॅर्डर देण्यात आल्या आहेत. दरम्यान, भूषण गगराणी यांना नगरविकास विभागात मुख्य सचिवपदी बढती देण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी गगराणी मात्र सध्या सिडकोतून जाण्यास फारसे इच्छुक नाहीत. यासंदर्भात गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्राने दिली.>विमानतळाचे काय होणार ?नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा २0१९ मध्ये पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने सिडकोने प्रकल्पपूर्व कामे हाती घेतली आहेत. सुमारे २000 कोटी रुपये खर्चाच्या कामांच्या संबंधित ठेकेदारांना वर्कआॅर्डरही देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही.विमानतळ उभारणीसाठी पात्र ठरलेल्या जी. व्ही. के. कंपनीची निविदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यातच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक गगराणी यांच्या बदलीचे संकेत मिळू लागले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राजू गजपती यांनी काही दिवसांपूर्वी २0१९ पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार नाही, असे जाहीर विधान केले होते. सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान खरे ठरताना दिसत आहे.
‘सिडको’चे उपाध्यक्ष भूषण गगराणी यांच्या बदलीचे संकेत
By admin | Published: June 09, 2017 5:02 AM