मुंबई : कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांत अवयवदान चळवळीत खंड पडला आहे. त्यात याकाळात नेत्र दानात ही सुमारे ८० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोरोना पूर्वीच्या काळात ६६५३ नेत्रदानाची नोंद होती, तर २०२०-२१ दरम्यान केवळ १३५५ नेत्रदानाची नोंद झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागानुसार, एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी या काळात राज्यात २,८६८ नेत्रदानाची नोंद झाली आहे. मात्र कोरोनापूर्वी नेत्रदानाच्या झालेल्या नोंदीपासून हे लक्ष्य दूर आहे. कोरोना काळात संसर्गाच्या दृष्टीने नेत्रदानाला ब्रेक लागला होता. त्यानंतर जून २०२० पासून रुग्णालयात या सेवा सुरू झाल्या, त्यानंतर कासवगतीने यात प्रगती होत आहे. सध्या नेत्रदानासाठी राज्यात ८०० रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. सध्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता रुग्णालयातील सेवा पूर्ववत होत आहे, त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढेल अशी आशा आहे, असे आरोग्य संचालनालयाच्या सह संचालिका डॉ. पद्मजा जोगेवार यांनी दिली आहे.
गैरसमज अधिक- दुर्दैवाने देहदान व नेत्रदान विषयी अपेक्षित व्यापक जनजागृती झालेली नाही. जगात सुमारे दहा कोटी अंध व्यक्तींपैकी भारतात सुमारे अडीच कोटी अंध आहेत. त्यापैकी ७० % रुग्णांना नेत्र रोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते. - कुपोषण, अ जीवनसत्त्वांचा अभाव, डोळ्यांत कचरा, फटाक्यांचा स्फोट अथवा रसायन गेल्याने, तसेच गोवर, कांजिण्या अशा कारणांनी लहान वयात अथवा तारुण्यात दृष्टी गमावलेल्यांची संख्या २५ लाखांपर्यंत आहे. त्यामुळे नेत्रदान मोहीम दात्यांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे.
राज्यात २०१९-२० साली३०५८नेत्रदानाची नोंद झाली होती.त्यानंतर २०२०-२१ साली या नेत्रदानात तब्बल ७२ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. या कालावधीत केवळ८४७नेत्रदान करण्यात आले. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात १,७३३नेत्रदान करण्यात आले.