पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवार (दि. २८)पासून सुरू होणार आहे. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा परीक्षेस १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यात ८ लाख ४८ हजार ९२९ विद्यार्थी आणि ६ लाख ५६ हजार ४३६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अधिक संधी उपलब्ध झाल्याने ही वाढ झाली असावी, असा अंदाज राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.म्हमाणे म्हणाले, बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाविरोधात लढा’ हे अभियान राबाविले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७ याप्रमाणे सुमारे २५० भरारी पथके नेमण्यात आली आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, या विषयास एकूण १ लाख ११ हजार ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याच प्रमाणे या वर्षी प्रथमच मिलिट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी १ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिल्या जातील. (प्रतिनिधी)>विभागीय मंडळाचे हेल्पलाइन क्रमांक पुणे : (०२०) ६५२९२३१७२, नागपूर : (०७१२) २५६५४०३,२५५३५०७३, औरंगाबाद : (०२४०) २३३४२२८,२३३४२८४४, मुंबई : (०२२) २७८९३७५६,२७८८१०७५५, नाशिक : (०२५३) २५९२१४३६, कोल्हापूर : (०२३१) २६९६१०१़, १०२,१०३७, अमरावती : (०७२१) २६६२६४७,८, लातूर : (०२३८२)२५१६३३,२५१७३३९, कोकण : (०२३५२) २२८४८०>परीक्षा केंद्रात मोबाइल बंदीगेल्या काही परीक्षांचा अनुभव लक्षात घेता परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी ‘व्हॉट्सअॅप’वर बारावीची प्रश्नपत्रिका बाहेर पडते. परिणामी, परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदा विद्यार्थी, शिक्षक कोणीही परीक्षा केंद्रात मोबाइल घेऊन जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी केवळ अर्धा तास आधीच परीक्षा केंद्राच्या प्रमुखाच्या ताब्यात प्रश्नपत्रिका दिल्या जातील.- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत लक्षणीय वाढ
By admin | Published: February 28, 2017 4:51 AM