लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निधी नसल्याने घोडबंदर आणि दिव्यातील रखडलेली मलनि:सारण योजना आता ठाणे महापालिकेने केंद्राच्या अमृत अभियानांतर्गत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून येत्या महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवणार आहे. या योजनेसाठी आता १७९.०१ कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा १, २ व ३ अंतर्गत ही मलनि:सारण योजना राबवण्यात येत असून याअंतर्गत महापालिका हद्दीतील सुमारे ७१ टक्के भागांत ती कार्यान्वित होणार आहे. या योजनेचे सुमारे ८५-९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून मार्च २०१८ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. घोडबंदर आणि दिवा भागांत ही योजना राबवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. परंतु, या प्रस्तावास केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने ही योजना मागे पडली आहे. त्यामुळे आता पालिकेने नव्याने या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार केला असून या योजनेला घोडबंदर परिसरात भुयारी गटार योजना टप्पा क्र. ४ असे नाव देण्यात आले असून यामध्ये मानपाडा, ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, वाघबीळ, विजयनगरी, आनंदनगर, भार्इंदरपाडा, ओवळा, कासारवडवली, नागलाबंदर, गायमुख, पानखंडा, टकारडापाडा, सुकुरपाडा आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत ९ लाख ७९ हजार ७११ एवढी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. या कामांतर्गत संप व पंप हाउस बांधणे, एसटीपी प्लांट उभारणे, पाइपलाइन टाकणे आदींसह इतर कामे करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्राकडून ५९.६६५ कोटी, राज्य शासनाकडून २९.०८ कोटी आणि पालिकेचा हिस्सा ८९.५०५ कोटी असा खर्च केला जाणार आहे.
अमृत योजनेतून राबवणार मलनि:सारण प्रकल्प
By admin | Published: July 15, 2017 3:23 AM